आयुष्याचे गाणे गाणारा निसर्ग”दत्त” गायक

उपेक्षीत गायक दत्ताभाऊ पत्रिवार यांच्यासोबत खास गप्पा

0

दत्ताभाऊ हे अत्यंत साधे व सच्चे कलावंत आहेत. आयुष्याला अत्यंत आनंदाने जगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दत्ताभाऊंनी मजुरी हे उपजीविकेचे साधन निवडले. तेव्हापासून आजतागायत दत्ताभाऊ बांधकामावर मजुरीच करतात. सिमेंट, रेती व गिट्टीचा मसाला कालवताना मिश्र रागातल्या गाण्यासारखं ते आयुष्यात गाणं आणि गाण्यात आयुष्य कालवत असतात….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘‘सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत’’ हा सवाल मंगेश पाडगावकरांनी एका कवितेत समस्त जगणा-यांना विचारला आहे. आपण आपल्या जगण्याच्या रहाटगाडग्यात एवढे कण्हत कण्हत जगतो की, आपलं गाणं आपण विसरतोच. मात्र तो आजही आयुष्य जगताना कितीही वेदना, कितीही अडचणी आल्यात तरी गाणं गातच जगत आहे. त्या आयुष्याच्या गायकाचं नाव आहे दत्तात्रेय गणपत पत्रिवार. अख्खं गाव त्यांना दत्ताभाऊ म्हणून ओळखतो.

तीस-पत्तीस वर्षांपासून तर मी स्वतःच या जगत्गायकाला मी ऐकतोय. अगदी माझ्या लहानपणापासूनच मी या कलावंताला पाहिलं. ऐकलं आहे. चौकात एखाद्या कोप-यात ‘‘माझे माहेर पंढरी…..’’चे सूर ऐकायला मिळालेत आणि आजूबाजूला पाच-सहा लोक दिसले की समजून घ्यावं की दत्ताभाऊंची मैफल रंगली आहे. दत्ताभाऊंना कोणत्याच फॉरमॅलिटीजची गरज नसते गाण्यासाठी. कवयित्री इंदिरा संतांनी म्हटलंय, की वेलीवर फुलं उमलावीत इतक्या सजतेने कविता उमलते. दत्ताभाऊंचं गाणंदेखील इतकंच सहज व सोपं असतं.

दत्ताभाऊंचे वडील गणपतराव पत्रिवार ग्रामसेवक होते. ते त्यासोबतच कीर्तनकार म्हणून परिसरातील पांढरकवडा, मेंढोली, सायतखर्डा अशा गावांमध्ये कीर्तनाला जायचे. कीर्तनासोबत ते थोडेबहूत गायचेदेखील. दत्ताभाऊंना खरा गाण्याचा वारसा मिळाला तो त्यांच्या आईकडून. जनाबाई पत्रिवारांकडून. आई जनाबाई उत्कृष्ट गायच्या. आईच्या अंगाईगीतांच्या स्वरांपासून, देवघरातील भजनापर्यंतचे स्वर दत्ताभाऊंच्या कानातून थेट अंतरंगात शिरायचे. जन्मापासूनच स्वरांमध्ये मोठ्या झालेल्या दत्ताभाऊंना वेगळं गाणं शिकावं लागलं नाही. हे अंतरंगात झिरपलेलं गाण्याचं बीज फुलतच राहिलं आणि दत्ताभाऊंच्या ओठांवर सहजतेने दरवळत राहिलं.

घरची गरिबी व कोणतंच वातावरण नसल्यामुळे दत्ताभाऊंना संगीतात विशेष काही करता आलं नाही. बरं त्यांच्या गायकीच्या छंदाची कुणी दखलही घेतली नाही. आजही दत्ताभाऊंना ती सल दुखावते. लहान गाव, त्यात पोटापाण्याचा प्रश्न अशाच चक्रात दत्ताभाऊंचं गाणं गुंतलं. त्या काळात त्यांनी मॅट्रीकपर्यंतचं शिक्षणदेखील पूर्ण केलं. पुढे चालून पोलिसांत जॉईन होण्याची संधी त्यांना आली होती. मन मात्र संगीत व गाण्यात गुंतलेलं असल्यामुळे दत्ताभाऊंना नोकरीत रस वाटला नाही. त्यांनी ती नोकरी नाकारली. वयाची चाळीशी गाठत असताना त्यांचं लग्न झालं. नवा संसार सुरू झाला. सौ. रेखासोबत लग्न झालं. आता दोनाचे चार हात झाले होते. दत्ताभाऊंनी मजुरी हे उपजीविकेचे साधन निवडले. तेव्हापासून आजतागायत दत्ताभाऊ बांधकामावर मजुरीच करतात. सिमेंट, रेती व गिट्टीचा मसाला कालवताना मिश्र रागातल्या गाण्यासारखं ते आयुष्यात गाणं आणि गाण्यात आयुष्य कालवत असतात.

वणीतील एकमेव संगीत अलंकार दिवंगत गजेंद्र बापूजी पवार यांच्याही ते संपर्कात आले. भजनांमध्ये पवार गुरूजी दत्ताभाऊंना गाण्याची संधी देत. अनेकदा कौतुकाने दत्ताभाऊंच्या पाठीवर कौतुकाची थाप देत. वणीतील इशरत पेंटर, हिदायत पेंटर व काहींच्या ऑर्केस्ट्रामध्येही दत्ताभाऊ गायचे. दिवंगत आनंद गेडाम यांनी त्यांना ऑर्केस्ट्रामध्ये आणलं. दत्ताभाऊंची स्वप्ने फार मोठी होती. आजही आहेत. एक तर घरची गरिबी आणि दुसरे म्हणजे त्यांच्या साधेपणाचा कळस या दोन्ही गोष्टी त्यांच्या गायकीच्या व्यावसायिक यशाच्या आड आल्यात.

 

दत्ताभाऊ हे अत्यंत साधे व सच्चे कलावंत आहेत. आयुष्याला अत्यंत आनंदाने जगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मित्रांच्या फरमाईशवर ते गाण्यात काही विनोदी प्रयोगही करतात. त्यातला एक म्हणजे ‘‘भाताची उकळी’’. त्यांच्या एका मित्राने हा किस्सा सांगितला. ‘‘भाताची उकळी’’ हा प्रकार मी संगीतक्षेत्रात कधीच ऐकला नव्हता. त्यामुळे मला कुतूहल वाटलं. अनेक संगीत तज्ज्ञांनाही विचारलं. उत्तर नाही मिळालं. शेवटी ज्यांनी हा संदर्भ दिला त्यांनाच फोन करून विचारलं. थोडंस हसतच त्यांनी ‘‘भाताची उकळी’’ हा गायनप्रकार सांगितला. ‘‘भाताची उकळी’’ दत्ताभाऊंनी डेव्हलप केलेली ही एक स्टाईल आहे. भात करण्यासाठी तांदूळ चुलीवर ठेवल्यावर जसा उकळताना आवाज येतो. त्या स्टाईलने दत्ताभाऊ गातात. क्लासिकल व टेक्निकल अशा प्रक्रियेत नसले तरी दत्ताभाऊ मनापासून गातात हे निर्विवाद सत्य आहे.

मागे कधीतरी वणीत दत्ताभाऊ भेटले. त्यांची तीच जुनी सायकल आणि कामावर जायची घाई झळकत होती. त्यामुळे त्यांच्याशी निवांत बोलता आलं नाही. दहा-पंधरा वर्षांपूर्वी मी आणि निकेशने त्यांची लोकल न्यूज चॅनलवर मुलाखत घेतली होती. दत्ताभाऊ लहानपणापासून गात आहेत. त्यामुळे संपूर्ण वणीकर त्यांना ओळखतात. आजही संध्याकाळी कामावरून परत जाताना त्यांची भेट झाली. मी म्हटलं थोडा वेळ बोलूया. ते तयार झाले आणि गप्पा रंगल्यात.

दत्ताभाऊ पुन्हा भेटले. दिवसभराच्या कष्टाचे, श्रमाचे देहभर पसरलेले अवशेष दिसत होते. सिमेंट, रेती, मातीने कपडे व पूर्ण देह लिंपलेला होता. कलावंत मात्र तसाच ताजा होता. टवटवीत होता. चौकातल्याच एका कार्यालयात त्यांच्या गाण्याचा व्हिडिओ घेतला. बाकी गप्पांसाठी कुणाच्याच मालकीचा नसलेल्या एका कोप-यात आम्ही बसलो. बोलता बोलता पुन्हा दोघांचीच मैफल रंगली.

कानाच्या वर दुमडून ठेवलेला हात आणि डोळ्यांत गावयाच्या गाण्याप्रती असलेली नितांत श्रद्धा ठेवून दत्ताभाऊ गायला लागले…… ‘‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…..’’ मी या ख-या अर्थानं जगणा-या गायकाकडे आत्मलीन होऊन पाहत राहिलो. मी आयुष्याला ऐकायला लागलो. मी माझ्यादेखील जगण्याला ऐकायला लागलो. कवी नारायण सुर्वेनी म्हटलं होतं, ‘‘जसा जगत आहे, तसाच शब्दातही आहे.’’ अगदी तसेच मला दत्ताभाऊ दिसले. जसा गातो तसाच जगण्यावरही हा कलावंत प्रेम करताना मला दिसला. शतदा हा शब्द कमी पडेल. आयुष्यातील क्षणाक्षणावर प्रेम करणारा खरा कलावंत वाटला दत्ताभाऊ. दिवसभराच्या घामाने निथळलेले कपडे, सिमेंट मातीने खराब झालेले कपडे असा काहीच अडथळा व संकोच या कलाकाराला आला नाही.

आयुष्यदेखील गाणं आहे. प्रत्येकानेच ते गावं म्हणून निसर्गाने वेगवेगळे स्वर भरलेत यात. स्वर आयुष्यातल्या सुख-दुःखासारखे असतात. एखाद्या रागात एखादा स्वर वर्ज्य असतो, तो त्या रागात लागत नाही. पण तो स्वर लागत नाही म्हणून गाणं थांबत नाही. आहे त्या स्वरांसह आणि नाही त्या स्वरांसह मस्त क्लासिकल गाता येतं. आयुष्याला क्लासिक गाता येतं. रागांमध्ये सर्वच स्वर असणं बंधनकारक नाही. आयुष्याच्या रागात असलेल्या स्वरांनी आणि नसलेल्याही स्वरांनी अत्युच्च गायकी करता येते जिंदगीची. दत्ताभाऊंना ते जमतंय…. ग्रेस म्हणतात अगदी तसंच…..
क्षितिज जसे दिसते
तशी म्हणावी गाणी
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी
गाय जशी हंबरते
तसेच व्याकूळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही
अलगद भरून यावे
दत्ताभाऊ तुमच्यातील ग्रेट कलावंताला सलाम. तुमच्या आयुष्याच्या सुंदर गाण्यासाठी मंगलकामना…..
सुनील इंदुवामन ठाकरे
8623053787
9049337606

लिंकवर क्लिक करून पाहा दत्ताभाऊ यांच्या गाण्याचा व्हिडीओ….

Leave A Reply

Your email address will not be published.