मानवी प्रवृत्ती आणि आपण…..

मानवी जीवनातील नित्याच्या, सहज; पण वेगळ्या घटनांवर प्रकाश टाकणारा, पूनम विधाते यांचा लेख....

0

पूनम विधाते, वणी: हॅलो मित्रमैत्रिणींनो !
आज माझा एका वेगळ्याच वळणावर विचार सुरू होता. तुम्हालाही हेच प्रश्न कुठेना कुठे, कधी न कधी पडतच असतील. म्हणजे एका नॉर्मल व्यक्तीलाही प्रश्न पडतच असतील असं मला तरी वाटतं. माझं ग्रॅज्युएशन संपल्यांनंतर मी पुण्यात जॉब शोधायला आले. शेगावला असताना कॉलेजलाईफमध्ये कधी बाहेरच्या जगाशी संपर्कच नाही आला.

आपल्या लाईफ मधली चार वर्षे मी अगदी आनंदाने हॉस्टेलच्या जगात घालवली. मुख्यतः माणसाचं मन, माणसाचे विचार हे त्याच्या सराउंडिंगनुसार होतात. या गोष्टीला कोणीही नाकारू शकत नाही. म्हणूनच सारख्या विचारांचे लोक क्वचितच आपल्याला मिळतात.

माझ्या आयुष्यातील या गोष्टींना सुरू होऊन २२ वर्षे उलटली. आज पर्यंत मी माझे २२ वर्षे कशात इन्व्हेस्ट केली? असा प्रश्न स्वतःला विचारला तर हसायला येते. कारण उत्तर तयार असते. अभ्यासात…या अभ्यासात मी काय कमवलं उत्तर येतं मार्क्स. या मार्क्समुळे मला काय मिळालं, तर मला फक्त 10 वी पर्यंत ओळख मिळाली. कारण व्यक्तीच्या मर्क्सवरून त्याची गुणवत्ता ठरवायची आपल्याकडे पद्धत आहे ना. त्या अभ्यासामधून चांगले संस्कार आपल्यावर घडावेत हा त्यातला मुख्य उद्देश. पण आपण या अभ्यासाला घोकंपट्टी असं नाव देऊया.

लहानपणी अभ्यास करताना आई म्हणायची अभ्यास कर. मग 12 वी मध्ये इतकं काही नसतं. पण वास्तविकता काहीतरी वेगळीच असायची. मग 12वीमध्ये म्हणतात, की आता अभ्यास कर कॉलेजमध्ये एन्जॉय करशील.आता ऐकते जॉब कर मग काय एन्जॉयच एन्जॉय.आता मला सांगा नक्की एन्जॉय करायचा कधी? कारण या एन्जॉयच्या डिमांडस् तर वाढतच चालल्यात ना. एकंदरीत आता कळतं की, आपल्या मनाला समजवायची ही एक मानवी वृत्ती आहे.

या बाहेरच्या जगात बऱ्याच विभिन्न प्रकारचे लोक आहेत.हे आपल्याला तेव्हाच कळतं, जेव्हा आपण प्रत्यक्षात त्यांच्या संपर्कात येतो. “हा खूप स्वार्थी माणूस आहे.” अशा प्रकारची वाक्यं आपण नेहमीच वापरतो किंवा ऐकतो. त्या व्यक्तीला म्हणताना आपण कधी विचार केलाय का, की आपण काय करतोय.

आज असं झालंय की, एकाचा आनंद दुसऱ्याचं दुःख झालंय.आपण सगळेचजण आपापल्या फायद्याचं बघतोय. लहानपणी शिकवलं जातं गरजू लोकांना मदत करा. या गोष्टी आज आपण किती तंतोतंत पाळतो बघाना.

माझ्या प्रत्ययाला आलेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छिते. एकदा मी बसमध्ये प्रवास करत होते.सिटीबसमध्ये बरीच गर्दी असते. याला मात्र तिळमात्र शंका नाही. एक काकू. आजीबाई म्हटलं तरी चालेल, बसलेल्या होत्या. त्यांचा मुलगा तिथेच त्यांच्या बाजूला उभा होता. त्या आजीबाईच्या बाजूला एक मुलगी बसलेली होती. तिचा स्टॉप आल्यावर ती तिथून उतरली, तेव्हा अचानक त्या आजीबाईंनी तिच्या मुलाला बसायला बोलवले. ती व्यक्ती बसायच्याआधी एक आजोबा त्या व्यक्तीला म्हणाले “अहो बसू देता का मला प्लीज, मला पायांचा त्रास आहे हो”.

प्रगतशील भारतातल्या त्या तरुण व्यक्तीने कसे वागायला पाहिजे होते?? नक्कीच त्याने त्या वृध्द व्यक्तीला बसू द्यायला हवं होतं. इतकं पण नाही त्यांनी हो किंवा नाही असं उत्तर दिलं असतं तरीही चाललं असतं. पण आजचा सुशिक्षित व्यक्ती त्या आजोबांकडे दुर्लक्ष करतो. हे कितपत योग्य आहे. एखादा मूकबधीर मुलगासुद्धा हातवारे करून हो किंवा नाही असे बोलला असता. पण त्या व्यक्तीकडे बघून न बोलणं हे कुठल्या पुस्तकात लिहिलंय.

तो तरुण शांत होता. त्याला शांत करणारा दुसरा तिसरा कोणीही नसून त्याचा ‘स्वार्थ’ होता. आता सांगा शिक्षण गरजेचं आहे का? सगळ्यांना आवडेल उत्तर द्यायला की ‘नाही’. पण असंही म्हणू नका या जगात वावरायला शिक्षण गरजेचं आहे. फक्त शिकवलेली प्रत्येक पान लक्षात ठेवण्यापेक्षा त्याचा सारांश लक्षात ठेवणं जास्त सोपं आणि गरजेचं आहे. दिवसेंदिवस माणसांची वृत्ती बदलत जातेय. एकेकाळी शिवरायांच्या सांगण्यावरून जीव द्यायला तयार होणारी ही प्रजा, आज एकमेकांचा जीव घ्यायला मागेपुढं बघत नाही. कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. बघा विचार करा.

पूनम विधाते, वणी (लेखिका या इंजिनियर असून सध्या तामिळनाडू येथे नोकरी करतात. विविध सामाजिक प्रश्नांवर त्या लिहितात. )

(बहुगुणी कट्ट्यामध्ये आपणही लेख पाठवू शकता…. संपर्क- [email protected] Mobile – 9096133400)

Leave A Reply

Your email address will not be published.