चौकट आणि वर्तुळ

कवी, लेखक, निवेदक, मुक्त पत्रकार सुनील इंदुवामन ठाकरे यांचं स्पेशल आर्टिकल

0

सुनील इंदुवामन ठाकरे: आपल्या जगण्याला एक चौकट असते. प्रत्येकाच्या आयुष्याची एक चौकट ठरलेली असते. या चौकटीत आपण जगत असतो. घर, पोटापाण्याची सोय, विरंगुळा व मित्र परिवार एवढ्या चौकटीतच आपण शक्यतो जगत असतो. चौकट म्हटलं की चार स्पष्ट दिशा असतात. या दिशांच्या पलीकडे एक विश्वात्मक वर्तुळ, सर्कल आहे. त्या वर्तुळाची, सर्कलची निश्चित दिशा ठरवता येत नाही. चौकटीच्या आठ-दहा दिशा आपण ठामपणे सांगू शकतो. वर्तुळाच्या अगणित दिशा असतात. सामान्यजन हे चौकटीत जगत असतात. तर असामान्य लोक हे या वर्तुळात वर्तुळाच्याही पलीकडे जगताना आपल्याला दिसतात.

आपण ठरवलं तर आपली चौकट. आपण ठरवलं तर आपलं वर्तुळ इतकं साधं हे गणित आहे. एका सामान्य जिवाला आयुष्यात काय हवं असतं? तर एक भरपूर पैसा देणारी नोकरी किंवा व्यवसाय. नवरा-बायको, लेकरू, घर, गाडी, बँक बॅलंस इतकी या चौकटीची मर्यादा असते. घर, नोकरी, व्यवसाय व आपले छंद वगैरे इतक्या काटकोन त्रिकोणातही जगणारे अनेक आहेत. या त्रिकोणाला, चौकटीला भेदून जे विश्वात्मक वर्तुळाचे प्रवासी होतात ते महान ठरतात.

भगवान बुद्ध हे शाक्य गणराज्याचे अधिपती महाराजा शुद्धोदनाचे पुत्र होते. एवढं बलाढ्य गणराज्य होतं. पत्नी यशोधरा व पुत्र राहुल होता. सगळी वैभवसंपन्न चौकट त्यांना लाभली होती. संत तुकाराम हे मोठे सावकार होते. भरपूर शेतीवाडी होती. स्थावर व जंगम अशी त्यांची मोठी मालमत्ता होती. बायका-लेकरं, कवितेची प्रतिभा असं बरंच काही त्यांच्या चौकटीत होतं. स्वराज्य संकल्पक शहाजी राजे फर्जंद होते. म्हणजे राजघराण्याच्या तोलामोलाचं त्यांचं पद होतं. पराक्रमी व संपन्न घरातल्या राजमाता जिजाऊ शूर व ज्ञानी होत्या. त्यांना त्यांची एक समृद्ध चौकट होतीच. म्हणजे पुढील अनेक पिढ्याा घरी बसून खातील इतकं ऐश्वर्य त्यांच्याकडे होतं. पण या सगळ्याांनी आपल्या चौकटींच्याही पलीकडल्या विश्वात्मक वर्तुळात प्रवेश केलाच. भगवान बुद्ध जर केवळ चक्रवर्ती सम्राट झाले असते तर किती जणांचा आणि किती काळ ते लक्षात राहिले असते? संत तुकाराम सावकार म्हणून किती काळ लोकांच्या स्मरणात राहिले असते? शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ किती जणांच्या लक्षात राहिल्या असत्या. हे जर सगळे आपल्या चौकोनातच राहिले असते तर ते विश्वात्मक कधीच झाले नसते.

यांनी आपापल्या चौकटीच्या पलीकडे झेप घेतली. राजपुत्र सिद्धार्थाने ही चौकट तोडली. ते विश्वव्यापी वर्तुळाच्याही पलीकडे गेलेत. त्यांनी संपूर्ण मानवजातीचे कल्याण झाले. ते महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध झालेत. आज अडीच हजार वर्षांनंतरही त्यांचं कार्य, त्यांचं जगण्याचं तत्त्वज्ञान, त्यांची प्रेरणा, त्यांचा धम्म अजूनही जिवंत आहे. शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊंनी त्यांच्या चौकटीबाहेरील विश्वव्यापी वर्तुळात प्रवेश केला. त्यांच्याच प्रेरणेतून छत्रपती शिवरायांनी जनसामान्यांसाठी रयतेचं स्वराज्य उभं केलं. तसं पाहता त्यांच्या चौकटीत शहाजी राजे आणि राजमताता जिजाऊ हे संपन्न व वैभवशालीच होते. पण त्यांच्या चौकटीपलीकडच्या निर्णयामुळे ते विश्वव्यापी झालेत. घरी सावकारी असलेले तुकाराम बोल्होबा आंबिले हेदेखील त्यांच्या चौकटीत संपन्नच होते. अत्यंत व्यवहारकुशल व शेतीसह अनेक विषयांत ते तज्ज्ञ होते. त्यांच्या अभंगातून त्यांची प्रतिभा व त्यांच्या ज्ञानाचा आवाका आपल्याला दिसतो. आपली सावकारी, आपला परिवार, आपल्या कविता या चौकटीच्या पलीकडे ते गेलेत. म्हणूनच ते जगद्गुरू संत तुकोबाराय झालेत. आपल्या अभंगातून जगणं कसं उदात्त करता येईल याचं भरभरून पण अत्यंत सोपं तत्त्वज्ञान त्यांनी दिलं. सावकार व कवी म्हणून किती लोकांच्या व किती काळ तुकोबाराय लक्षात राहिले असते त्यांच्या चौकटीसह?. ते चौकटी मोडून विश्वात्मक वर्तुळाच्याही पलीकडे गेलेत. संपूर्ण जगभरातून त्यांच्या अभंगांचा अभ्यास होतो. त्यावर संशोधन होत आहे.

आपल्याला नाही पेलवत अशी चौकट मोडायला ही सामान्यजनांची धारणाच असते. आपण भलं नि आपलं काम भलं एवढीच चौकट अधिकाधिक मजबूत करून अनेकजण या चौकटीतच जगतात आणि मरतातदेखील. आपण संपूर्ण जगाची माहिती ठेवतो. इंटरनेट, सोशल मीडियावरून सगळ्याच अपडेटस् घेत असतो. आपण आपली माहिती तेवढी कधीच ठेवत नाही. तुकोबारायांनी ‘‘तुका म्हणजे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणासी’’ म्हणत स्वतःचा शोध घेतला. आपण जर आपला शोध घेतला तर आपल्याला जाणवेल की आपली चौकट किती छोटी आहे. या चौकटीच्याही पलीकडे असलेलं विश्वात्मक वर्तुळ आपल्याला खुणावत आहे. बोलावत आहे. हाका मारत आहे.

डेबुजी झिंगरूजी जाणोरकर नावाच्या एका व्यक्तीचा कलदार नदीच्या पात्रात पडतो. डेबुजी अत्यंत अस्वस्थ होतात. एक कलदार त्याचे कितीही मूल्य का असेना पात्रात गेल्यावर त्याचं काहीच मूल्य राहत नाही. किंबहुना नदीतले जलचर ते खाऊदेखील शकत नाही. मग त्या रूपयाची पाण्यात पडल्यावर काहीच किंमत वा अर्थ राहत नाही. ही गोष्ट डेबुजींच्या लक्षात येते. मानवी जन्माचंही असंच आहे हे त्यांना कळतं. ते डेबुजी झिंगरूजी जाणोरकर ही चौकट तोडतात. पुन्हा एका विश्वात्मक वर्तुळात प्रवेश करतात. या डेबुजींचे या विश्वात्मक वर्तुळात क्रांतयोगी गाडगेबाबा होतात.

भूमिती, जॉमेट्रीमध्ये वर्तुळात चौकोन व चौकोनात वर्तुळ काढा असं बरंच काही असायचं. शाळेत असताना आपण हे शिकलोदेखील. ज्ञानदेव माऊलींनी पसायदान हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठलाला मागितलं नाही. ते विश्वात्मक देवालाच मागितलं आहे. चार भावंडांना शुद्धीपत्र मिळावं, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी या चौकटीसाठीचं हे दान नक्कीच नव्हतं. बरं केवळ वारकरी संप्रदायातील मंडळीसाठीदेखील नव्हतं. केवळ महाराष्ट्रातील किंवा भारतातील नागरिकांसाठी नव्हतं. जे केवळ विठोबाला किंवा हिंदू देवतांना मानतात त्यांच्याही साठी नव्हतं. ही चौकटच होती. या चौकटीच्या पलीकडल्या विश्वात्मक वर्तुळातून त्यांनी हे पसायदान मागितलं. ‘‘जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात’’ असंच मागणं होतं पयासदानात. यातील ‘‘जो’’ किंवा ‘‘प्राणीजात’’ हे कोणत्या चौकटीतले असतीलही. पण मागणं मात्र हे विश्वात्मक वर्तुळातलंच आहे.

‘‘जाने दो ना. अपने को क्या करना है’’ ही चौकट झाली. महात्मा जोतिबा फुले, डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हे अलीकडच्या काळातील चौकटीच्या बाहेरील विश्वात्मक वर्तुळातील महामानव आहेत. हे विश्वव्यापी आहेत. त्यांनी मानवतेचं हीत पाहिलं. मानवतेच्याच कल्याणासाठी ते लढलेत. आपल्यासारख्यांना त्यांची प्रेरणा तरी घेता येईल निदान. माझं, माझं करीत असंच आयुष्य वाया जाईल, गाडगेबाबांच्या पाण्यात पडलेल्या कलदारासारखं. घराच्या चार भिंतींच्या चौकटीत पूर्ण समाजाचं विश्व आहे. चला या विश्चाचे नागरिक होऊया. या विश्वात्मक वर्तुळात आपल्या क्षमतांना, आपल्या कर्तव्यभावनेला काहीतरी करण्याची संधी देऊया. धन्यवाद!

सुनील इंदुवामन ठाकरे

8623053787
9049337606

Leave A Reply

Your email address will not be published.