एक चाय दो चम्मच!

सुनील इंदुवामन ठाकरे यांचा लेख खास बहुगुणी कट्ट्याच्या वाचकांसाठी

0

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर:  ‘‘मामा चंद्रपूरला कुठे आहे, भेटूया!’’ भाचीचा मेसेज आला. म्हटलं नक्कीच भेटू. दोघांनाही सेंटर म्हणून बसस्टॅण्डजवळ भेटलो. चांगलंच ऊन होतं म्हणून चौकातल्या हॉटेलला बसलो. रिकामंच काय बसायचं म्हणून चहा मागवला. मला चहा दिवसभर कधीही चालतो. भाची म्हणाली मी चहा थोडासाच घेईन. मग ठरलं की एक चहा दोघांनी शेअर करायचा.

वणीला लोकमान्य उपहारगृहात अशा सिच्युएशनमध्ये मी ‘‘एक चाय दो चम्मच अशी ऑर्डर करतो.’’ एक चहा व एक रिकामा ग्लास येतो. तशीच ऑर्डर मी चंद्रपूरच्या त्या हॉटेलच्या माणसाला दिली. तो अत्यंत ‘‘शब्दप्रामाण्यवादी’’ होता. त्याने आमच्या टेबलवर पुढ्यात खरोखरंच एक चहा आणि दोन चमचे ठेवले.

आमच्या टेबलवर कॉलेजच्या तीन पोरी बसल्या होत्या. त्यांचं हसणं थांबता थांबलंच नाही. मात्र तो चमचे व कप ठेवणारा स्थितप्रज्ञासारखा निर्विकार होता. माझ्या भाचीलाही हसून ठसका लागला.

बरेचदा आपण आपापले चहाचे कप मागवतो. आपण आपला चहा पितो सोबत्यांसोबत आणि निघून जातो. पण आपलं वर्तमान, आपले सुख-दुःख या चहाच्या कपासारखेच असतात. एकाच दुकानातल्या चहाला निराळी चव नसते. रंगही तोच असतो आणि गंधही तोच असतो. फक्त प्रत्येकाचा ग्लास वेगळा असतो, बघा.

आयुष्यदेखील अशीच चहाची टपरी असते. त्यातील दिवस किंवा क्षण हे चहाच्या ग्लासारखे सर्वांचेच सारखेच असतात. फक्त अनुभवांचे व परिस्थितींचे वेगवेगळे फ्लेव्हर्स त्याला असतात. प्रत्येकच जण श्वास घेत असतो. खात-पीत असतो. दैनंदिन व्यवहार करीत असतो. एका सायकलमध्ये आयुष्य सुरूच असतं.

कधी भेटलं कुणी जवळचं तर या आयुष्याच्या हॉटेलातून, एकच चहा ऑर्डर करावा. दोन आठवणींचे आणि शब्दांचे चमचे मागवावेत. एका समान अनुभुतीच्या चहाला एकमेकांसोबत शेअर करावं. एकमेकांच्या आभाळाने, एकमेकांच्या अंगणातल्या बागेला ओल द्यावी.

बरेच दिवस कुढत असलेला एखादा हुंदका फुटूही शकतो. दिलखुलास हास्याने छताच्या टिनाही उडू शकतात. चहाच्या टपरीवर थांबलं पाहिजे. कुणासोबत एकाच ग्लासातला चहा दोन चमच्यांनी शेअर केला पाहिजे. एरवी आपण धावतच असतो. पळतच असतो. कशाचा म्हणजे कशाचाच आस्वाद घेत नाही जगताना.

आपण दिवसेंदिवस अधिकाधिक फॉर्मल होत चाललो. आपल्याला ताप आला आणि कुणी विचारलंच तरी आपण स्पष्ट सांगत नाही. ‘‘काही नाही, असंच’’ वगैरे म्हणून टाळतो. देहाची लक्षणं दिसतात. मनाची दिसतच नाही. मनातलं कसं कळणार. जे मनात असेल ते साचू नये. बोलून मोकळं व्हावं. साचलं की डबकं होतं विचारांचं. जुन्या आठवणींचे शेवाळ साचायला लागतात. मग कितीही उठून पुढे जायचं म्हटलं की माणूस घसरतो व तिथेच पडतो.

नदीसारखं वाहत असावं. प्रवासापर्यंत गाडीत बसतो ते ठीक आहे. पण ही गाडीच म्हणजे माझं सगळं काही हे योग्य नाही. त्याला ‘‘आसक्ती वासक्ती’’ असं आध्यात्मातले अनेक गुरू म्हणतात. वारा कसा आपल्यासोबत असतो. आपल्या देहातूनही भटकत असतो. तसा तो कुणाचाच नसतो आणि सर्वांचाच असतो. भौतिकातून अभौतिकाचा प्रवास सुरू होतो.

थांबायचं तेव्हा आपण निसर्गतः थांबूच. पण केवळ धावणंही निसर्गाला मान्य नाही. रानावनात कितीतरी बीज हे उन्हाळ्यात जमिनीच्या आत अत्यंत संयमाने निवांत बसलेले असतात. पावसाची पहिली सर त्यांचे दार ठोठावते. ही बिजं हळूहळू आपापल्या घरातून बाहेर पडतात. पुन्हा मोकळा श्वास घ्यायला.

एवढा वेळ ते मातीशी एकरूप झालेले असतात. मातीसोबत आपल्या मनातलं सगळं काही बोलत असतात. म्हणून जेव्हा ते बाहेर येतात, तेव्हा ते जुन्या आठवणींची, वेदनांची टरफल जागेवरच फेकून देतात. अगदी कोवळ्या अंतकरणाने लहान लेकरासारखेच नव्याने बाहेर येतात.

भेटलं की, बोललं पाहिजे. आयुष्याच्या कपातला चहा एकमेकांनी शेअर करून पुढे गेलं पाहिजे. जिव्हाळ्याची माणसं आयुष्याच्या कपातला मधुर चहा आहे. आठवणींच्या आणि शब्दांच्या या दोन चमच्याने पुन्हा एकदा ‘‘त्या चहावाल्याला’’ ऑर्डर करूयात…. ‘‘भई, एक चाय दो चम्मच!’’

सुनील इंदुवामन ठाकरे
8623053787
9049337606

Leave A Reply

Your email address will not be published.