ती ‘‘ती’’ आहे….

कवी, गीतकार, लेखक, मुक्तपत्रकार, निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांचं विशेष आर्टिकल

0

सुनील इंदुवामन ठाकरे: बलात्काराच्या बातम्या सातत्याने सर्वच मीडियामध्ये झळकतात. कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होत असतं. मीडियावाल्यांसाठी ते मात्र फक्त ‘‘न्यूज ब्रेकिंग’’ असतं. ही अत्यंत अमानवी बाब आहे. बरं यातही पीडितेची जात किंवा धर्म आवर्जून टाकण्यावर मीडियाचा भर असतो. साधा प्रश्न आहे. हा कोणत्याही स्त्रीवरचा अन्याय हा अन्यायच आहे. ती स्त्री म्हणजे स्त्रीच आहे. तिला कशाला कोणत्या जाती-धर्मात अडकवावं?

पीडितेवर झालेल्या अन्यायाच्या बातम्या वारंवार चघळल्याच जातात. दिवसभर चर्चा, पॅनल डिस्कशन सुरूच असतं. पण इथे जात नि धर्म आणतातच कशाला मीडियावाले कळत नाही. दुःखाला किंवा वेदनेला जातही नसते आणि धर्मही नसतो. उदाहरणार्थ ए, बी, सी, डी असे धर्म घेऊया. यात ए धर्मातील पीडितेवर अन्याय झाला असेल तर मग फक्त ए धर्मातल्या लोकांनीच अस्वस्थ व्हायचं काय? बरं त्यातही बी धर्मातील कुणी असं वाईट कृत्य केलं असेल तर सगळे बी धर्मीय वाईट म्हणावे काय? जो कोणी हा गुन्हा, अपराध करत असेल त्याला दंड मिळालाच पाहिजे. त्याला लवकरात लवकर शिक्षा मिळालीच पाहिजे. त्या शिक्षेचा धाक इतरांनाही बसला पाहिजे.

इथे कशाचंही राजकारण होतं. अगदी कोणाच्या मरणाचंही भांडवल केलं जातं. एवढ्या सगळ्यांत कोणी केवळ माणूस म्हणून विचार करतो काय? करतात करणारे; पण अगदी मोजकेच.

स्त्रियांवरील सर्वच अत्याचार पुढे येत नाहीत. रोजच शोषणाच्या दुष्टचक्रातून अनेक स्त्रीया जात असतात. लैंगिक अत्याचाराचे प्रकारही व्यापक झाले आहे. कामतृप्तीच्या विवाहासारख्या ज्या व्यवस्था आहेत, त्यातही असे अत्याचार होतातच. पण कशाला बोलायचं आपण, हीदेखील वृत्ती असते.

बलात्कार, लैंगिक अत्याचार, शोषण हे निंदनीय आहे. मात्र त्याही पेक्षा याचं भांडवलं हे संतापजनक आहे. असे अत्याचार करणाऱ्यांचा फॉलोअप घेतला पाहिजे. त्यांच्यावर काय कारवाई झाली हे पाहिलं पाहिजे. काय अॅक्शन व काय प्रोसेस सुरू आहे हे पाहिलं पाहिजे. चार वेगवेगळे प्रतिनिधी न्यूज चॅनलवर घेऊन केवळ डिस्कशन सुरू असतं. अपराधी, गुन्हेगार मोकाट फिरत असतात. तेही बिनधास्त.

ही आपली लेक आहे. ही आपली बहीण आहे. ही आपली आई आहे. ही माझ्या परिवारातील सदस्य आहे. ही भावना रुजायला हवी. आपल्या डेली लाईफमध्ये आपले अनेक जाती धर्मातले मानलेले भाऊ, बहीणीपासून सगळेच नाते असतात. बाकी भारतीय म्हणून आपले सगळ्यांसोबतच नातं सख्खंच आहे. त्याच्याही पलीकडे संपूर्ण विश्वातील मानव आपलेच आहेत. एक मानवप्राणी म्हणून सगळेच आपले आहेत.

देहावरील अत्याचार हा केवळ देहापुरता मर्यादित नसतो. तो मनावर होतो. तो परिवारावर होतो. संस्कृतीवर होतो. तो जाणिवांवर होतो. देह हा जातीनुसार किंवा धर्मानुसार वेगळा नसतो. मनदेखील असं वेगळं नसतं. संस्कृती वेगळ्या असल्या तरी संस्कृती ही संकल्पना एकच असते. ‘‘दर्द का रिश्ता’’ हा युनिवर्सली एकच आहे. तो जाती, धर्मात, राजकारण अडकवू नये अशी अपेक्षा. अन्यायाविरूद्ध लढलंच पाहिजे. तो सहन करूच नये. त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे. शोषक म्हणजे शोषण करणारे आणि शोषित म्हणजे ज्यांचं शोषण होतं ते. यात शोेषकांची किंवा शोषितांची जात आपण कशी ठरवणार.

अन्याय हा मानवतेवर होतो. लैंगिक अत्याचार ज्या स्त्रीवर होतो ती स्त्री ही स्त्रीच असते. तिच्या वेदना, तिच्या संवेदना, तिचं वर्तमान, तिचं भविष्य हे कोणत्या जाती, धर्मात, प्रदेशात बांधता येईल? ती स्त्री असते म्हणूनच असे होते. मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिजमचा मी विद्यार्थी असताना ‘‘मीडिया लॉज अॅण्ड एथिक्स’’ हा एक स्वतंत्र विषयच होता. यात काही कायदे असतात. जे पाळलेच पाहिजेत. ‘‘असं करूच नये’’ असे स्पष्ट निर्देश असतात. मात्र ‘‘एथिक्स’’मध्ये बंधनकारक काहीच नसतं. यात सद्सद्विवेकबुद्धी अत्यंत महत्त्वाची असते. ‘‘लॉ’’नुसार अशा पीडितेची ओळख पटेल असे काही देऊ नये असे निर्देश आहेत. मात्र तरीही बातमी अतिरंजित करण्याच्या नादात, मुद्दाम काही देणं हे ‘‘नीती’’मध्ये बसत नाही. कुणा पीडितेची जात किंवा धर्म टाकणे हे कदाचित नीतीत बसायला नको.

जर कुणाच्या वेदना बघून जर आपण अस्वस्थ होऊन काही करत असू तरच आपण मानव म्हणून जिवंत आहोत असं म्हणता येईल. वेदनेला जात, धर्म, पंथ, गाव, देश, राष्ट्र असं काहीच नसतं. ती वैश्विक आहे. आपण या विश्वाचे सदस्य आहोत. त्यामुळे कुणावर अत्याचारच होणार नाही याची काळजी घेऊया. असे होताना दिसत असेल तर प्रतिकार करूया. प्रतिबंधक सावधगिरी बाळगुया. आपण जर माणूस म्हणून खूप मोठे आहोत. आपलं मोठंपण जपुया. इतरांनाही मोठं करूया. धन्यवाद!

सुनील इंदुवामन ठाकरे

8623053787
9049337606

Leave A Reply

Your email address will not be published.