हॉटेलनं नाकारली हिंदु-मुस्लिम दाम्पत्याला खोली

धर्म वेगळा असल्यानं दिला खोली देण्यास नकार

0

बेंगळुरू: बेंगळुरूतील एका हॉटेलच्या व्यवस्थापनाच्या पूर्वग्रहदूषित समजुतीचा फटका एका दाम्पत्याला बसला आहे. या हॉटेलच्या व्यवस्थापनाने एका हिंदू-मुस्लिम दाम्पत्याला रूम देण्यास नकार दिला. हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा एकत्र राहू शकत नाही, ते लग्न करूच शकत नाहीत, असे कारण हॉटेलमधील रिसेप्शनिस्टने दिले. तिने दिलेल्या या कारणामुळे या दाम्पत्याला धक्काच बसला आहे. दरम्यान, हॉटेलच्या मालकाने दाम्पत्याने केलेल्या या गंभीर आरोपाचे खंडन केले आहे. त्यांनी अवघ्या अध्र्या तासासाठी रूम मागितली होती. आम्ही पती-पत्नी आहोत, असे त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे रूम देण्यास नकार दिला, असे स्पष्टीकरण हॉटेल मालकाने दिले आहे.

केरळ येथील शाफीक सुबैदा हकीम आणि दिव्या डी. व्ही हे दाम्पत्य काही कामानिमित्त बेंगळुरूत गेले होते. ते सुदामा नगरमधील अन्नीपुरम रस्त्यावरील ऑलिव्ह रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये गेले. आम्हाला रूम हवी आहे, असे त्यांनी रिसेप्शनिस्टला सांगितले. पण तिने या दाम्पत्याला रूम देण्यास नकार दिला. हिंदू आणि मुस्लिम जोडपे एकत्र राहू शकत नाही, असे कारण तिने दिले. कोणताही वाद उद्भवू नये म्हणून हिंदू-मुस्लिम जोडप्याला रूम देऊ नये, अशा सूचना आपल्याला मिळाल्याचे सांगून तिने रूम देण्यास स्पष्ट नकार दिला. तिच्या उत्तराने आपल्याला धक्काच बसला, असे शाफिकने सांगितले.

येथील प्रतिष्ठित विधी महाविद्यालयात माझी पत्नी दिव्याला मुलाखतीसाठी जायचे होते. त्यासाठी आम्हाला काही तास थांबावे लागणार होते. आम्हाला दोन तासांसाठी रूम हवी होती, असे शाफिकने सांगितले. पण आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याला रूम द्यायची नाही, असे धोरण असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने आम्हाला सांगितले.

त्यावर नियम आणि अटींची प्रत आम्हाला दाखवावी, अशी विचारणा माझ्या पत्नीने त्यांच्याकडे केली, पण त्यांनी तेही देण्यास नकार दिला, असेही शाफिकने सांगितले. घडलेल्या प्रकाराची मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्याचा विचार असल्याचे या दाम्पत्याने सांगितले.
दरम्यान, हॉटेल मालक शिबू यांनी दाम्पत्याने केलेल्या आरोपाचे खंडन केले आहे. त्यांनी पती-पत्नी असल्याचे आम्हाला सांगितलेच नाही. याशिवाय त्यांनी केवळ अध्र्या तासासाठीच रूम मागितली होती. त्यामुळे रूम देण्यास नकार दिला, असे शिबू यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.