यूपीतील आमदार, खासदारांना टोलनाक्यावर स्वतंत्र मार्गिका

योगी सरकारचं व्हीआयपी संस्कृतीला प्रोत्साहन

0

लखनऊ: एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे भाजपशासित उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने व्हीआयपी व्यक्तींना ‘व्हीआयपी’ सुविधा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना म्हणजेच आमदार आणि खासदारांसाठी टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका असणार आहे.

आमदार आणि खासदारांसाठी टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात यावी, असे आदेश सरकारने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती वाहतूक कोंडीत अडकू नयेत, यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहेत. सरकार राज्यात व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्यासाठी वाहनांवरील अंबर दिवे हटवण्याचे आदेश देत आहे, तर दुसरीकडे हेच सरकार आमदार आणि खासदारांसाठी टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिकेची सुविधा देऊन व्हीआयपी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे काम करत असल्याचे काही अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

आमदार आणि खासदार दिल्ली अथवा लखनौमध्ये जातात. त्यावेळी त्यांच्या ताफ्यात चार ते पाच वाहने असतात. ती वाहने राज्य अथवा राष्ट्रीय महामार्गावरून जातात. तेथे अनेक टोलनाके असतात. पण जेव्हा नाक्यांवरील कर्मचारी त्यांच्याकडे टोल मागतात, त्यावेळी ते आणि त्यांचे सर्मथक कर्मचार्‍यांशी हुज्जत घालतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

अनेकदा तर टोल कर्मचार्‍यांना टोल मागितला म्हणून मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता सरकारने आमदार आणि खासदारांसाठी स्वतंत्र मार्गिकेची सुविधा देण्याचे आदेश दिल्याने व्हीआयपी संस्कृतीला अधिक प्रोत्साहन दिले जात असल्याचे दिसून येते, असे काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.