सेनेनं साथ सोडली तरी धोका नाही, सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी

राज्यात भुकंप होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी केलं स्पष्ट

0

मुंबई: भाजपा आणि शिवसेनेमध्ये कुरबुरी सुरू राहतात मात्र शिवसेनेसोबत पाच वर्ष गुण्यागोविंदाने सरकार चालवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच जर का शिवसेनेने साथ सोडली तर अनेक अदृश्य हात मदतीसाठी वेळोवेळी पुढे सरसावत असतात त्यामुळे राज्यात कोणताही भुकंप होणार नाही. तसंच या सरकारला कोणताही धोका नाही’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. एबीपी माझाच्या ‘व्हिजन पुढच्या दशकाचं’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयावर मोकळेपणाने आपली मतं मांडली. ‘आम्ही दोन वेगवेगळे पक्ष आहोत त्यामुळे थोड्या कुरबुरी होतच राहणार. पण त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. जर तशी परिस्थिती उद्भवलीच तर यासाठी अनेक अदृश्य हात हे आमचं सरकार वाचवण्यासाठी पुढे सरसावतील. त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. कोणताही भूकंप होणार नाही.’ असं स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यानी शिवसेनेला सुनावलं.

दरम्यान, याचवेळी राष्ट्रपती निवडणुकीच्या मतांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘208 मतं पडली यानेच मला जास्त आनंद झाला. 145च्या मतांची आकडेवारी ही मला मीडियातून समजली.’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

महाराष्टाचा विचार केल्यास देशाचं पॉवर हाऊस किंवा इंजिन म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं असं त्यांनी यावेळी सांगितलं. शेतीवर बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे, तसंच शाश्वत शेतीसाठी पाण्याचं नियोजन आवश्यक आहे. गटशेतीचा प्रयोग राज्यात राबवण्याची गरज असून शेती आणि उद्योगाची सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहे’.

(कर्जमाफी जाहिरातीवर सरकारनं केली लाखोंची उधळपट्टी)

कर्जमाफीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलले की, ‘कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येणार, पण विकासकामांसाठी वेगळा प्लॅन तयार आहे’. तसंच शेतक-यांसाठी आपण कोणाशीही चर्चा करायला तयार असून चर्चेने कमीपण येत नाही, कोणी लहान होत नाही आणि कोणी मोठंही होत नाही असं ते बोलले आहेत.

महाराष्ट्रानं उद्योग क्षेत्रातील अढळपद पुन्हा मिळवलं असल्याचं सांगताना उद्योग क्षेत्रात दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी गुंतवणूक हवी असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत. शेतीमधील गुंतवणूक पुढील दोन वर्षात वाढवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.