कोरंबी मारेगावातील अनोखा गणेशोत्सव

इतर गावांनी आदर्श घ्यावा असा कोरंबीतील गणेशोत्सव

0

बहुगुणी डेस्क, वणी: कोरंबी मारेगाव या गावातील गणेशोत्सव इतर गावातील गणेशोत्सवापेक्षा नक्कीच वेगळा आहे. या गणेशोत्सवाची विशेषतः म्हणजे या गावात जेवढ्या घरी गणेशाची स्थापना होते. त्याचे सर्व घरच्या गणेशाचे विसर्जन आणि महाप्रसाद एकत्रच होतो.

गेल्या सात वर्षांपूर्वी या गावात या आगळ्यावेगळ्या प्रथेला सुरुवात झाली. गावातील काही तरुण एकत्र आली आणि त्यांनी ज्य़ेष्ठांच्या मार्गदर्शनात गावातील सर्व घरगुती गणेशाचा महाप्रसाद आणि विसर्जन एकत्र करण्याचं ठरवलं. तेव्हा पासून ही प्रथाच इथे पडली आहे. सोमवारी या गावात एकत्रीत महाप्रसाद झाला. तर आज इथल्या 33 घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे या वर्षी आठ ते दहा इको फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना कऱण्यात आली होती.

एकत्र महाप्रसाद आणि विसर्जन करण्यामागचा उद्देश असा की यात सर्व जाती, धर्म, राजकीय पक्षाचे लोक या निमित्ताने एकत्र येतात. तसेच एकत्र सर्व कार्यक्रम घेतल्याने परिश्रम आणि पैशाची देखील बचत होते. दरवर्षी गावातील सुमारे दीड हजार लोक व दोन तीनशे पाहुणे आणि आमंत्रित लोक यांचं जेवण असते.

गणेशाचं विसर्जनही अगदी पारंपरिक पद्धतीने होते. समोर एक भजनी मंडळाच्या तालावर मिरवणूक काढली जाते. त्यामागे गावातील सर्व घरगुती गणपती असतात. संपूर्ण गावात मिरवणूक काढली की त्यानंतर कुणी कुंडात तर कुणी तलावात याचे विसर्जन करतो.

प्रत्येक घरगुती गणेशाची स्थापना करणा-या व्यक्तींकडून हजार रुपये वर्गणी काढली जाते. मात्र ती ऐच्छीक आहे. कुणी कमी देतो तर कुणाची ऐपत नसल्यास त्यांच्याकडून घेतलीही जात नाही. इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमाला फाटा दिला जातो. त्यातून पैशाची बचत केली जाते. गेल्या सात वर्षांपासून गावक-यांची चांगली बचत केली आहे. दोनतीन वर्षांत आणखी बचत करून एखादे वाचनालय सुरू करण्याचा किंवा विधायक कार्य करण्याचा गावक-यांचा मानस आहे. हा आदर्श दुस-या गावांनीही घ्यावा अशी इच्छा गावातील एका तरुणाने ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.