स्वच्छता अभियानाचा गल्लोगल्ली झंझावात…

14 नवीन घंटागाड्या करतील कचरा संकलन

0

निकेश जिलठे, वणीः स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून वणीकरांच्या सेवेत 14 APE घंटा गाड्यांचे (छोटा हत्ती) लोकापर्ण नामदार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्ड, दिनकर पावडे, विजय पिदुरकर यांच्या हस्ते झाले. विश्रामगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. या घंटागाड्यांचे वणीकर जनतेनीदेखील उत्साहाने स्वागत केले.

यावेळी ना. हंसराज अहीर यांनी आपले विचार व्यक्त केलेत. ते यावेळी म्हणाले की, वणी नगर परिषदेचं हे अत्यंत उत्कृष्ट पाऊल आहे. या घंटागाड्यांमुळे वणीकर नागरिकांना अधिक सुविधा होणार आहे. स्वच्छता हा आरोग्याचा पाया आहे. तो मजबूत असला की पुढील अनेक समस्यांवर सहज मात करता येते.

आमदार बोदकुरवार यांनी स्वच्छ वणीसाठी धडपडणारे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या कार्याचे कौतुक केले. ते नगरपरिषद वणीच्या विकासासाठी सदैव तत्पर राहतील अशी ग्वाही दिली. तारेंद्र बोर्डे हे वणी शहराला स्वच्छ व सुंदर करण्याकरिता विविध प्रयोग आणि प्रयत्न करीत असतात. यांनी सतत पाठपुरवा केला. याचाच परिणाम म्हणून 63 लक्ष रूपये किमतीच्या या गाड्या महाराष्ट्र शासनाच्या E Portal वरून खरेदी करण्यात आल्यात.

याप्रसंगी लोकप्रिय युवा नगराध्यक्ष तारेंद्र बोर्ड यांनी वणीकर जनतेला आवाहन केले. त्यांनी कचारा वर्गीकरणावर चर्चा केली. नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा वेगळ्या डब्यांमध्ये जमा करावा असेही ते यावेळी म्हणाले. असे केल्याने कचऱ्याची तंत्रशुद्ध विल्हेवाट लावणं सोपं जातं. घंटागाडीत ओल्या व सुक्या कचऱ्याचे दोन वेगळे कप्पे आहेत. नेमक्या कप्प्यातच नागरिकांनी हा कचरा टाकावा. यामुळे वणी ही स्वच्छ व सुंदर होण्याकरिता सर्व जनतेचा हातभार लागेल.

याप्रसंगी आरोग्य सभापती सुभाष वाघडकर, नगरसेवक नितीन चहानकर, नीलेश होले , प्रीती बिडकर , संगीता भंडारी, राकेश बुगेवार , मनीषा लोणारे, ममता ताई अवताडे, विजय मेश्राम, प्रशांत निमकर, अक्षता चव्हाण, स्वाती खरवडे, माया ढुरके, अभियंता किशोर ढापले, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, सर्व नगरसेवक व शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.