दुचाकी अपघातात वेकोली कर्मचाऱ्याचा मृत्यू

ब्लॅक डायमंड सिटी झाली एक्सिडेंट सिटी

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नायगाव जवळ अपघातसत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. शनिवारी सकाळी एका वेकोली कर्मचारी आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी घराबाहेर पडला. रस्ता लहान असल्याने गाडी रोडवरून खाली उतरली असता पुन्हा रोडवर घेण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातात त्यांना डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला.

सकाळी ठरल्या वेळेप्रमाणे 9वाजता शेषराव नारायण टोंगे (55) रा. प्रगतीनगर, वणी हे माजरी येथे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 29 ए पी 8671 ने जाण्यासाठी निघाले. ते वेकोलीचे एरिया स्टोर येथे लिपिक पदावर कार्यरत होते. नायगाव जवळ वळण रस्त्यावर त्याची दुचाकी रोडच्या खाली उतरली. गाडी पुन्हा रोडवर घेण्याच्या प्रयत्नात दुचाकी वाहन उसळले व त्यामध्ये शेषराव खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व नाकाला जबर मार लागला.

त्या वाटेवरून जाणाऱ्या एका ऑटो चालकाने माणुसकीचा परिचय देत शेषराव यांना वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी सिटी स्कॅन करण्यासाठी वणीतील एका खाजगी रुग्णालयात रेफर केले. त्यानंतर रिपोर्ट बघून डॉक्टरांनी सांगितले की, डोक्याला गंभीर इजा झाली आहे त्यामुळे रुग्णास त्वरित नागपूर येथे हलविण्यात आले. नागपुरात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी शेषराव यांना मृत घोषित केले.

नायगाव येथे या अगोदरही अनेक निष्पाप जीवांना अपघातात आपला जीव गमवावा लागला. अनेक सामाजिक संघटना व सुजाण नागरिकांनी गती अवरोधकाची मागणी केली. परंतु मागणीला अखेरची टोपली दाखवण्यात आली. आता इतके अपघात झाल्यानंतर ही प्रशासन केव्हा जागे होणार याकडे वाणीकरांचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.