‘२६/११’ चा हिवरीचा आरोपी जंगलातच

0

विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील पोलीस हवालदार राजेंद्र मेश्राम खून प्रकरणातील आरोपी अनिल मेश्राम हा परिसरातील जंगलातच दडून असल्याची खात्री पोलिसांना झाली आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या हिवरी येथे स्वतःच्या घरी येरझारा सुरू झाल्या आहेत. गावात येऊन  मोठ्या आवाजात  बडबडून अप्रत्यक्षपणे पोलिसांसह लोकांना धमकावत असल्याचा ग्रामस्थांचा सूर आहे.

२५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री नंतर म्हणजेच २६/११ ला सोमवारी  एक वाजताच्या दरम्यान आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने हल्ला केला. यात पोलीस हवालदार राजेंद्र कुळमेथेचा मृत्यू झाला. तर पोलीस हवालदार मधुकर मुके, पोलीस प्रमोद फुफरे जखमी झाले होते.

आरोपीचा शोध घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील पोलिसांची पलटण कामी लागली होती.  मात्र जंगलात जागता पहारा ठेवूनही आरोपीचा थांगपत्ताही लागला नाही. घटनेच्या आठ दिवसानंतर जंगलातील पोलिसांनी आरोपी शोध मोहीम मागे घेतली. आरोपी गुराखी असल्याने त्याला जंगलाची परिपूर्ण माहिती आहे. जंगलात अनेक दहा बारा घरांचे पोड आहे. कदाचित आरोपीचे नातेवाईक एखाद्या पोडावर राहत असण्याची शक्यता आहे. आरोपीला कदाचित पोलिसांच्या हालचालीचा सुगावा कुणी तरी देत असण्याची दाट शक्यता आहे.

शोध मोहीम थांबताच आरोपीच्या गावात येरझारा सुरू झाल्या. गावात आरोपी अनिलची आजी आणि थोडी मानसिक संतुलन बिघडलेली बहीण राहते. त्यांना भेटण्यासाठी तो शनिवारी सकाळी घरी आला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारी आणि बुधवारी दुपारी घरी आल्याचे समजते. यावेळी आरोपीने एका लाकडी पाटीला खिळे ठोकून पाटी सोबत घेऊन गेल्याचेही सांगितले जाते. आरोपीच्या दहशतीमुळे गावकरी पोलिसांना आरोपीचा सुगावा देण्यास हिम्मत करीत नाही. मात्र पोलीस आरोपीला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.