भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर आपणास माहीत आहे काय?

सध्या सुरू असलेल्या अधिकमासात जाणून घ्या याचे महत्व

0 307

सुनील इंदुवामन ठाकरे, माजलगाव: सध्या पुरुषोत्तममास सुरू आहे. या महिन्यात भगवान पुरुषोत्तमाचे भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील या एकमेव मंदिरात भक्तजनांची दर्शनासाठी गर्दी सुरू झाली. बुधवारपासून महिनाभर अधिकमासात इथे यात्रा सुरू झाली आहे. या क्षेत्राचा आणि महिन्याचा महिमा बघता महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील दर्शनार्थी इथे दाखल होतात.

मलमास, अधिकमास, धोंड्याचा महिना आणि पुरुषोत्तममास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिन्यात इथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. बीड जिल्ह्यात गोदावरी काठावर वसलेले हे पुरूषोत्तमपुरी गाव राष्ट्रीय महामार्ग क्र- २२२ वर माजलगाव – गेवराई दरम्यानच्या सारवरगावपासून १० कि.मी. अंतरावर आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या पर्वकाळात येथे लाखो भाविक येतात. यावर्षी १६ मे ते १३ जूनपर्यंत ही यात्रा भरणार आहे. याची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली आहे.

 

गोदावरी तटावर पुरूषोत्तमाचे हे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम सुमारे १५०० वर्षांपूर्वी झाल्याचे शिलालेख येथे आहेत. या मंदीराचा कळस व बांधणी हे केदारनाथ मंदीर (उत्तराखंड) पध्दतीचे आहे. शेजारीच वरदविनायक, सहलक्षेश्वर महादेव, पार्वती पादुका मंदिर आहे. वरदविनायक मंदीर हे वृंदावनातील कृष्णमंदीराची प्रतिकृती असल्याचे दिसते. मुख्य पुरूषोत्तम मंदीरातील पुरूषोत्तमाची मूर्ती ही गंडकी शिलेची असून ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. चतुर्थभुजाधारी पुरूषोत्तमाच्या हातात शंख, चक्र, पद्म असून मूर्ती मनमोहक अशी आहे. हे मंदीर स्थापत्यकलेचा आदर्श नमुना असून मंदिराच्या विटा या पाण्यावर तरंगतात व मंदीरातल्या गरुडध्वजा पंढरपूर येथील मंदिराची आठवण करून देतात.

 

पुरुषोत्तम तेराव्या महिन्याचा स्वामी आहे. भारतीय संस्कृतीत धोंड्याच्या महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात पुरूषोत्तमाला सोन्याचे, चांदीचे, पुरणाचे, पेठ्याचे धोंडे अर्पण करण्याची प्रथा आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक मासाचे वर्णन धोंडे महाल या ग्रंथात असून बारा महिन्याचे बारा स्वामी असतात. परंतु उरी-सुरीच्या तेराव्या महिन्याचा स्वामी कोण होणार? यावरून पुरूषोत्तमाने हे स्वामीत्व स्वीकारले व तेव्हापासून या महिन्याला पुरूषोत्तम मास हे नाव पडल्याचा उल्लेख आढळतो. या महिन्यात जावयांना पुरणाचे धोंडे खाऊ घालण्याची प्रथा ही महाराष्ट्रातील घराघरात जोपासली जाते. अधिकमासात सौभाग्यवती स्त्रिया येथे गोदावरीत स्नान करून पतीच्या समृध्दी व दीर्घायुष्यासाठी पुरूषोत्तमाला ३३ धोंडे अर्पण करतात व सुखाची कामना करतात. त्यामुळे या महिन्यात राज्यातून अनेक महिला या यात्रेत सहभागी होत असतात.

 

हैद्राबाद येथे ताम्रपट व तांब्याचा गरुड निजाम राजवटीत या स्थळाला फार मोठा मान होता. निजामाने या देवस्थानच्या देखरेखीसाठी शेकडो एकर जमिनी दिल्या होत्या. याबाबत ताम्रपट देऊन त्यावर या जमिनी कोणाकडे वहितीसाठी द्याव्यात याचा उल्लेख होता. परंतु हे ताम्रपट व तांब्याचा गरुड हैद्राबाद येथील पुराणवस्तू संग्रहालयात संग्रहीत आहे. यामुळे या क्षेत्राच्या देखरेखीसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही.

 

पौराणिकदृष्ट्या प्रसिध्द असणाऱ्या या मंदिराला निजाम सरकारने भरघोस मदत दिली होती. तीर्थक्षेत्राला न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. त्याकाळीच येथे अनेक कामे झाली. परंतु; महाराष्ट्र शासनाने मात्र अद्याप यास पर्यटन स्थळाचा दर्जा दिला नाही.यामुळे एकमेवाद्वितीय असलेले हे मंदिर अद्याप विकासापासून कोसो दूर आहे. अनमोल ठेव्याचे जतन करून यास विशेष पर्यटनक्षेत्राचा दर्जा मिळावा जेणेकरून येथे पायाभूत सुविधा उभारल्या जातील अशी मागणी श्रद्धाळू करीत आहेत. (साभार)

750 X 422 PODDAR
Comments
Loading...