वाहक ‘‘उत्तम’’ विचारांचा

एका सच्च्या कार्यकर्याची कहाणी सुनील इंदुवामन ठाकरे यांच्या शब्दांत...

0

सुनील इंदुवामन ठाकरे: जणू काही ‘‘अष्टपुत्र भव’’ हा आशीर्वाद सुळकेंसाठी खराच ठरला. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील हरू (गोडेगाव) येथील महादेव सुळके यांना आठ मुलं आणि एक मुलगी झाली. त्यातील सातवं अपत्य म्हणजे ‘उत्तम’. महादेव आणि त्यांची पत्नी मंजूळाबाई यांची गुजराण थोड्याशा शेतीवर व्हायची. ही जमीनदेखील सासऱ्यानं जावयाला दिली होती. अकरा सदस्यांचा परिवार चालवणे म्हणजे महादेव व मंजूळाबाईंसाठी तारेवरची कसरत झाली होती. महादेव व मंजूळाबाई दोघेही विशेष शिकलेले नव्हते. त्यात नऊ अपत्य. पण सर्वांना शिक्षण मिळावं अशी त्यांची इच्छा होती.

 

उत्तमरावांचे आई-वडील

 

1968साली मोठ्याा भावाने उत्तमला नागपूरला शिक्षणासाठी आणलं. 1974ला दहावी पूर्ण झालं. मग 1988 पर्यंत खाजगी नोकरी करत उत्तम दिवस काढायला लागला. घरोघरी ते दूध वाटायला जायचे. त्यांना या कामासाठी बाटलीमागे दहा पैसे मिळायचे. आज ज्या ठिकाणी मॉडेल मिल परिसरात घर आहे, तिथे पूर्वी अनेकदा फूटपाथवर अनेक दिवस काढलेत. ज्या दूध डेपोसाठी ते काम करायचे, त्याच दूध डेपोचे ते पुढे मॅनेजरही झाले. त्यांचे अधिकारी त्यांचा छळ करू लागले. त्यांची बदली करण्यासाठी वाटेल ते प्रकार सुरू झालेत. जो अधिकारी हा एवढा खटाटोप करीत होता, तो भ्रष्ट असल्याचं उत्तमरावांच्या लक्षात आलं. त्यांनी अॅण्टीकरप्शन खात्यात तक्रार केली. त्या अधिकाऱ्याला वठणीवर आणलं. अत्यंत प्रामाणिक जीवन जगणारे उत्तमराव सत्यासाठी कुठेच तडजोड करीत नाहीत. वाचनाची त्यांना प्रचंड आवड आहे. पुस्तकांचं चांगलं कलेक्शन आहे त्यांच्याकडे.

पुस्तकांत आणि लोकांत रमणारे उत्तमराव

या संघर्षपूर्ण काळात त्यांनी डॉ. कुमार पेशने यांच्याकडे काम केलं. नागपुरातील ठवकर ब्रदर्सकडेही काही काळ सेवा दिली. 1979ला नागपूरला गणेशपेठ बसस्टॅण्ड येथे पानठेला चालविला. उत्कृष्ट सेवेतून बसस्टॅण्ड परिसरात त्यांचा माहोल तयार झाला. दरम्यान समाजसेवक आणि पत्रकार उमेशबाबू चौबेंच्या ते संपर्कात आले. क्रांतज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, क्रांतयोगी गाडगेबाबा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या विचारांचा पगडा किशोरवयीन उत्तमच्या मेंदूत ठासून भरायला लागला.

उमेशबाबूंच्या भेटीने उत्तमची कार्य करण्याची दिषाच बदलली. तरूणाईचं सळसळतं रक्त उत्तमच्या धमण्यांतून उसळत होतं. उमेशबाबूंसारख्या संयमी नेतृत्त्वाचं ऐन तारुण्यात दिग्दर्शन व्हायला लागलं. उमेशबाबूंनी नागपुरात ‘जययुवक क्रांती दल’ हे युवकांचं संघटन बांधलं. उत्तमला एस. टी. स्टॅण्ड शाखेचं अध्यक्ष केलं. आता सळसळत्या ऊर्जेला प्रेरणा व दिशा मिळाली होती. मोठ्याा उत्साहाने व जोषाने तरूण उत्तम कामाला लागला. शोषणमुक्ती, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोध अशा मोहिमांवर उत्तमसह तरुणाईची ही फटलण कामाला लागली. त्या काळात 75 वार्डांतून एकूण 56 शाखा उघडल्या होत्या. मनोहर पहेलवान, दिनेश वैद्य, भोला माने, शंकर हाडके, सुभाष उमाटे, मामा गौर, नारायण गौर, नरेंद्र तिवारी, सुरेश चमके, सुरेष भुते, किशोर समुद्रे असे हजारों कार्यकर्ते याच चळवळीत सक्रीय होते. त्यातही रामुजी वानखेडे, सुभाष येणुरकर, पुरुषोत्तम कुंभलकर, सुधाकर चकोले, सुरेश शिंदे, शांतीलाल जैन, लालशंकरजी पुरोहित, श्रीराम वैद्य, खुशालराव माहोड यांची उत्तमरावांना विशेष साथ होती. या चळवळीत तेव्हा कार्य करणाऱ्यांची एक सक्षम व संस्कारी पिढी घडली. आज त्यातील काहींनी मोठमोठ्याा राजकीय पदांवर आपलं नाव कमावलं.

उमेशबाबू चौबे यांचा आदर्श समाजकार्यात प्रेरणा

तरूण व जिंदादिल उत्तम एस. टी. स्टॅण्ड शाखेचा प्रमुख होता. एस. टी. कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे स्नेहबंध जुळलेत. मुळातच बोलक्या स्वभावाच्या उत्तमने सगळ्याांना आपलंसं केलं होतं. तेव्हाचे एक कंडक्टर मनोहर कहुरके यांनी उत्तमला लायसन्स बॅच नंबर काढायला सांगितला. उत्तमने तो काढला. पुढे उत्तमला एस. टी. डिपार्टमेंटमधून नोकरीचा कॉल आला. 1988साली इंटरव्ह्यू झाला. उत्तमचं शिक्षण जेमतेम दहावीपर्यंतचं होतं. नोकरी लागेल की नाही अशी वेगळी मनस्थिती उत्तमची झाली होती. हे काळजीचं सावटं निघालं. उत्तमला कंडक्टर म्हणून एस.टी.त नोकरी मिळालीच. लोकांमध्ये बारा महिने, चोवीस तास रमणाऱ्या या बोलक्या जिवाला ही संधी म्हणजे दुधात साखरच होती.आता उत्तम सुळके नोकरीत व्यस्त झाले. लहान असो की मोठा सर्वांचेच ते उत्तमकाका झालेत. तेव्हाची लोखंडाची तिकिटांची पेटी गळ्याात आली. नियमित प्रवास करणाऱ्यांच्या गळ्याातले ताईतच झाले उत्तमराव.

‘‘भीक मागतो, भिकारी नाही. कागद फाडतो, पागल नाही. घंटी वाजवतो, पुजारी नाही.’’ हे खास स्लोगन त्यांच्या स्पेषल स्टाईलमध्ये ऐकण्यात वेगळाच मजा येतो. उत्तम महादेव सुळके या व्यक्तिमत्त्वाची आपल्या मन व मेंदूत कायमची जागा तयार होते. कुणाचाही हा त्यांच्या पहिल्या भेटीतला हा अनुभव दुसऱ्या भेटीत नावीण्यपूर्ण ठरतो. डाव्या हाताने सॅल्यूट ठोकून अगदी त्यांच्या काळजाच्या गाभाऱ्यातून निघणारे ‘‘जय जिजाऊ – जय सावित्री’’ हे अभिवादन त्यांच्या वैचारिक, परिवर्तनवादी अंतर्मनाची साक्ष देतात. सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांचा हा उत्साह असाच कायम आहे. आडवळणाच्या तरुणाईतच त्यांचे सरळ पाऊल पडले ते सामाजिक क्रांतीत. याच सरळ वाटेने ते अव्याहतपणे आपल्या साध्या आचारांतून आणि अत्युच्च विचारांतून मार्गक्रमण करीत आहेत. आजही ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संस्था, मराठा सेवा संघ अशा 25हून अधिक संघटनांमध्ये सक्रीय आहेत. 11 संस्थांचे ते आजीवन सदस्य आहेत.

मित्र, परिवारासह प्रत्येक क्षणाचा आनंद लुटणारे उत्तमराव

सन 1985साली गणेशपेठ बसस्थानक परिसर चौकात त्यांनी ‘सर्व धर्म सम भाव’ या शीर्षकाचा फलक लावून लोकवर्गणी काढली. त्यातून सर्वांना प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवरायांचं तैलचित्र लावलं. सामाजिक कार्यातील विविध पत्रके किंवा अन्य उपक्रमांसाठी ते खिशातून खर्च करतात. राजमाता जिजाऊंचा फोटो असलेलं पेन आणि अनेक महामानवांचे फोटो असलेली फ्रेम हे ते अनेक वर्षांपासून अनेकांना भेट देतच आहेत. कोणताही सामाजिक कार्यक्रम असो, उत्तमकाका ‘‘ऑलवेज बिफोर टाईम’’ हजर. कार्यक्रम झाल्यावर सगळी आवरासावर करून बाहेर पडणारी शेवटी व्यक्तीदेखील उत्तमकाकाच असतात. त्यांना तरुणांबद्दल विशेष जिव्हाळा आहे. ते युवकांबाबत अत्यंत दक्ष असतात. चळवळीतील नवीन व युवा कार्यकर्त्यांसोबत बोलताना, चर्चा करताना ते स्वतः तरूण होतात. समवयस्क होतात. त्यामुळे त्यांच्यासोबत बोलताना कोणत्याही युवकाला ‘ज्येष्ठ नागरिक’ सोबत असल्याचा फिल येत नाही.

स्वखर्चातून महामानवांचा फोटो व पेन हे गिफ्ट उत्तमराव अनेकांना देतात

उत्तमरावांपासून आणखी एक गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे ‘‘डॉक्युमेंटेशन’’. त्यांनी आपल्या सामाजिक चळवळीतील प्रत्येक कागद न् कागद जपून ठेवला आहे. कितीतरी फाईल्समध्ये त्यांनी सर्व इतिहास संग्रही करून ठेवला आहे. एवढी मोठी सामाजिक कार्याची व्याप्ती असूनदेखील त्यांनी कोणत्याही पुरस्काराची लालसा बाळगली नाही.

त्यांच्या डोक्यात आणि ओठात चळवळ हाच एकमेव विषय असतो. ते दिवसरात्र जणू चळवळच जगतात. त्यांचसाठी चळवळ श्वास, चळवळच निश्वास, चळवळच ध्यास झाली आहे. अलीकडे ते एस.टी.तून ‘वाहक’ पदावरून रिटायर्ड आहेत. परंतु त्यांच्यातील ‘वाहक’ त्यांना अजूनही शांत बसू देत नाही. आतापर्यंतच्या नोकरीत प्रवाशांना ‘वाहून’ नेणारा, प्रवाशांना जोडणारा ‘कंडक्टर’ आता विचारांचा ‘वाहक’ झाला आहे. उत्तमराव सुळके यांचा 9890481251 हा मोबाईल नंबर आजही दिवसभर खणखतच असतो. कुणाला कसलंही काम असो, पहिला फोन उत्तमकाकांनाच असतो.

त्यांच्या कार्याला सदैव सहकार्य करणाऱ्या त्यांची पत्नी

त्यांना वाटतं एवढी वर्षे पगार घेऊन प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली. आता रिटायर्ड लाईफमध्ये सेवा सुरूच आहे. पुढे जीव गेल्यावर या देहाची राख होऊ नये. म्हणूनच त्यांनी देहदानाचा संकल्प कितीतरी वर्षांपूर्वीच करून ठेवला आहे. समज आल्यापासून सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकले. पुढे जोपर्यंत श्वास राहील. देह साथ देईल तोपर्यंत तरूणाईच्या उत्साहाने लढण्याचा, कार्य करण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांना दीर्घायू व आनंदी आयुष्य चिंतितो….

सुनील इंदुवामन ठाकरे
8623053787
9049337606
[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.