मारेगाव पोलिसांवर आरोपीचा हल्ला, मध्यरात्री घडला थरार

जमादाराचा मृत्यू, दोन पोलीस जखमी

0

विलास ताजणे, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे रात्री उशिरा आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी आरोपीनी अचानक पोलिसांवर हल्ला चढवला. यात एक पोलीस ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना दि.२६ सोमवारी मध्यरात्री दरम्यान घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यापासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या हिवरी येथील ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना. मारेगावचे पोलीस निरीक्षक वडगावकर यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार मधुकर निळकंठ मुके वय ५२,  हवालदार राजेंद्र बाजीराव कुळमेथे वय ४८, पोलीस शिपाई प्रमोद फुफरे वय ३१, पो.चालक राहुल बोन्डे वय ३२,  पोलीस नाईक निलेश वाढई वय ३५  सर्व पोलीस वाहन क्रमांक एम.एच. ३७ ए ४२४६ ने अजामीनपात्र वारंट घेऊन आरोपी अनिल लेतू मेश्राम वय ३५ याला ताब्यात घेण्याकरीता आरोपीच्या घरी आज सोमवारी रात्री एक वाजताच्या सुमारास गेले.

सदर पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला आवाज देऊन पोलीस असल्याचे  सांगितले. तुझ्यावर अटक वारंट आहे. म्हणून पोलीस ठाण्यात सोबत येण्यास सांगितले. तेंव्हा मी येत नाही. तुम्ही माझे काय करता ते मी पाहून घेतो. मला हात लावून दाखवा असे म्हणत आरोपी आणि त्याची आई इंदिरा मेश्राम यांनी लाकडी दांडक्याने पोलिसांवर हल्ला चढवला.

अचानक झालेल्या हल्याने पोलीस घाबरून गेले. यात जमादार राजेंद्र कुळमेथे यांच्या डोक्याला, हाताला आणि तोंडाला गंभीर मार लागल्याने ते खाली कोसळले. पोलीसांनी स्वरक्षणासाठी हल्ला रोखण्याचे प्रयत्न केले. परंतु आरोपीच्या आक्रमकतेपुढे पोलीस हतबल झाले. यावेळी पोलीस हवालदार मधुकर मुके, पोलीस शिपाई प्रमोद फुफरे या हल्यात गंभीर जखमी झाले.

आरोपीच्या आक्रमक भूमिकेमुळे घाबरून पोलिसांनी मोठ- मोठ्याने आवाज देत गावातील लोकांना मदतीला बोलविले. मात्र आरोपी अंधारात पळून गेला.यावेळी गावातील गुणवंत देरकर आणि सहकारी मदतीला धावून आले. गंभीर जखमी राजेन्द्र कुळमेथे यांना घेऊन पोलीस माघारी मारेगावला आले.

राजेंद्र कुळमेथेसह सर्व जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी कुळमेथे यांना मृत घोषित केले. तर मधुकर मुके, प्रमोद फुफरे यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची फिर्याद हवालदार मधुकर मुके यांनी मारेगाव पोलिसात दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.