जनतेची कामं आणि संविधानाचं रक्षण हेच प्रमुख कर्तव्य: खा. धानोरकर

मारेगावात खा. बाळू धानोरकर यांचा भव्य नागरी सत्कार

0
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मी जरी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असलो तरी आता लोकप्रतिनिधी आहे. सर्वांच्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. सध्या सत्ताधा-यांकडून लोकशाही धोक्यात आणण्याचा पुरेपुर प्रयत्न होत आहे. मात्र आमची संख्या कमी असली तरी ही लोकशाही कशी टिकून राहिल यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेल अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी मारेगावकरांना दिली. दिनांक 3 जून रोजी सोमवारी संध्याकाळी खा. बाळू धानोरकर यांचा मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्रात भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की इतके वर्ष भाजपकडे सत्ता असूनही खासदारांना परिसरातील विकास करता आला नाही. बेरोजगारीसारखा मोठा प्रश्न इथे असताना एकही मोठा उद्योग आणून स्थानिकांना रोजगार देण्यात माजी खासदार अपयशी ठरले आहेत. इतके वर्ष सत्ता भोगल्याने परिसरात अनेक छोटे मोठे प्रकल्प आणून बेरोजगारीचा प्रश्न सोडवता आला असता. परिसराचा विकास करता आला असता. मात्र ते माजी खासदाराला जमले नाही. त्यामुळे परिसरात जो विकासाचा बॅकलॉग आहे तो भरून काढणे हे माझे प्राथमिक काम असल्याचेही खा. बाळू धानोरकर म्हणाले.

मारेगावात प्रथम आगमनानिमित्त नवनिर्वाचीत खासदार बाळू धानोरकर यांचा काँग्रेस मित्र पक्षाच्या वतीने मारेगावमध्ये नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी साडे सात वाजता स्थानिक शेतकरी सुविधा केन्द्रात हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार होते. तर सत्कार मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा, संजय देरकर, नानाजी खंडाळकर, नरेंद्र ठाकरे, अरुणाताई खंडाळकर, पं. स. सभापती शीतल पोटे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल देरकर यांच्यासह मनसे व मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. महेंद्र लोढा, संजय देरकर, वामनराव कासावार इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यासाठी सर्वसामान्यांनी मंचावर एकच गर्दी केली होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले तर संचालन प्रा. सतिश पांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार विप्लव ताकसांडे यांनी मानले.
Leave A Reply

Your email address will not be published.