वणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला लागली घरघर

गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिका-याविना पंचायत समिती

0

रवी ढुमणे, वणी: वणी पंचायत समिती शिक्षण विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोव-यात असतो. सध्या या पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांचा पत्ताच नाही. परिणामी ग्रामीण भागातील शाळा व तिथं शिकवणा-या शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. हा सर्व सावळागोंधळ सुरू असतानाही पंचायत समिती प्रशासन आणि पदाधिकारी मात्र हातावर हात ठेवून बसल्याचं  दिसत आहे.

वणी तालुक्यातील कित्येक शाळांचा भार एकाच शिक्षकांवर आहे. शासनानं गेल्या एप्रिल महिण्यापासून विषय शिक्षक, समायोजन आणि बदलीसाठी अर्ज मागविले होते. यातील विषय शिक्षक व समायोजन करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी सुध्दा झाल्याचा आरोप झाला होता. या संबंधी तक्रारी सुध्दा करण्यात आल्या. त्यानंतर शासनानं शिक्षकांच्या बदल्या होणार यासाठी अर्ज मागविले होते. मात्र ऑनलाईन अर्ज करण्याचं पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ते कधी बंद तर कधी सुरू राहिलं.

जुले महिना संपत येतोय तरी अद्याप बदल्याच्या कोणत्याही हालचाली शासनस्तरावरून झाल्या नाहीत. अगदी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर कार्यरत असलेले शिक्षक बदलीची आस लावून बसले होते. मात्र शहरालगत असलेल्या शाळांतील शिक्षकांना शासनाच्या वेळकाढू धोरणाचा जणू फायदाच झाला. अद्यापही ही प्रक्रीया रखडलेलीच आहे.

वणी, मारेगांव तालुक्यातील अनेक द्विशिक्षकी शाळांचा भार एकाच शिक्षकावर असल्याचं दिसत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आंतरजिल्हा बदली होउन आलेल्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरायच्या होत्या. मात्र यातील 10 जागांपैकी केवळ एकच जागा भरल्याची चर्चा आहे.

मारेगांवात 20 हून अधिक शाळामध्ये शिक्षकांची पदे रिक्त असतांना दोनच शिक्षकांचा भरणा केल्याची चर्चा आहे. मागील महिण्यात वणी पंचायत समिती मधिल दोन विस्तार अधिकारी सेवानिवृत्त झाले आहे. तर एकाची बदली झाली आहे. वारंवार प्रभारावर असलेल्या वणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा कारभार आता बेभरवशे चालल्याचं दिसत आहे. तसेच मारेगाव पंचायत समितीचेही हेच हाल आहे.

अत्यंत महत्त्वाचा मानला जाणा-या शिक्षण विभागाचा कारभार प्रभारावर असल्यानं विद्यार्थी व शिक्षकांचे नुकसान होत आहे. कोणतेही कामे वेळेवर न होणे, शासनाच्या आदेशाची अमलबजावणी न करणे असे प्रकार सुध्दा घडायला लागले आहे. पंचायत समितीमध्ये रिक्तपदामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानं रिक्त शाळांवर शिक्षकांचा भरणा करून वणी, मारेगाव येथे कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.