वणीत भाजपच्या विविध कार्यक्रमांचा फ्लॉप शो

अत्यल्प प्रतिसाद ठरतोय मंत्रीमहोदयांच्या चिंतेचा विषय

0

विवेक तोटेवार, वणी: लवकरच लोकसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यानंतर पाच ते सहा महिन्यातच विधानसभेची निवडणूक होणार आहे. येणा-या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सत्ताधारी पक्षांनी विविध कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. कार्यक्रम म्हणजे लोकांशी जुळण्याचे एक उत्तम साधन तसेच त्याचा फायदा पक्षाची प्रतिमा उंचवण्यासाठी ही होते. गेल्या काही दिवसांपासून वणी परिसरात भाजपद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र हे कार्यक्रम सपशेल फ्लॉप ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपाबाबत लोकांमधली विश्वासाहर्ता कमी झाली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपच्या फ्लॉप कार्यक्रमांची मालिका…

24 फेब्रुवारीला वणीतील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये उकणी, नायगाव, बेलोरा येथील शेतकऱ्यांना धनादेश वितरणाचा कार्यक्रम पार पडला. याचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध व भव्य दिव्य होते. कार्यक्रमात कोणतीही कसर न ठेवण्याची पूर्ण काळजी घेण्यात आली. कार्यक्रमासाठी 120 बाय 300 चा भव्य मंडप उभारण्यात आला. जवळपास 5 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली. 3000 खुर्च्या लावण्यात आल्या व तितक्याच लोकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

पण या कार्यक्रमात फक्त 600 ते 700 शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली. मात्र खुर्चा रिकाम्या दिसत असल्याने आयोजकांनी समयसुचकतता दाखवत रिकाम्या खुर्च्या मंडपातून काढुन घेतल्या. सदर परिस्थिती का झाली असावी याची प्रचिती मंत्री महोदयांना आली. या ठिकाणी उपस्थितांची संख्या वाढविण्याची जबाबदारी स्थानीक नेत्यांची होती. मात्र उपस्थितांची संख्या बघितल्यावर मंत्र्यांना घाम पुसण्याची वेळ आली. वास्तविक पाहता हा कार्यक्रम वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे होते. परंतु हा कार्यक्रम भाजपच्या वतीने घेण्यात आला हे विशेष !

यानंतर 28 फेब्रुवारीला कल्याणमंडपम येथे शहर व तालुका प्रमुख कार्यकर्त्यांचा बूथ मेळावा घेण्यात आला. याठिकानीही 800 कार्यकत्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्या कार्यक्रमातही कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. अखेर केवळ 80 कार्यकर्त्यांनी तिथे भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर दोन दिवसांतच वसंत जिनिंग सभागृहात पंचायत समितीद्वारे सरपंच मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमातही उपस्थितांची संख्या खूप कमी होती त्यामुळे यावेळीही मंत्री महोदयांचा चांगलाच भ्रमनिरास झाला.

18 फेब्रुवारीला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराला अनेकांनी आपली मोफत तपासणी करून घेतली. ठराविक कार्यक्रम हा सकाळी 10 वाजत सुरू होणार होता. परंतु मंत्री तब्बल 4 तास उशिरा आल्याने तपासणीसाठी आलेल्याची चांगलीच तारांबळ उडाली. तपासणी सुरू असतानाच उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या घटनेच्या एक महिन्यापूर्वी हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमतही पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. परंतु ही बाब अनेकांनी झाकूनच ठेवली.

आमदार बाळू धानोरकर जाणार काँग्रेसमध्ये ?

एकीकडे भाजपचे कार्यक्रम फ्लॉप ठरत असताना दुसरीकडेच वरोरा-भद्रावती मतदारसंघाचे आमदार बाळू धानोरकर हे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांचा जर का काँग्रेसमध्ये प्रवेश झाला तर ती एक राजकारण धवळून काढणारी बाब ठरू शकते.

बाळू धानोरकर यांना लोकसभेची तयारी करण्याचे आदेश मातोश्रीवरून मिळाले होते. त्यानुसार खा. अहिर यांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी त्यांनी जनसंपर्क वाढवण्याचा सपाटा लावला. वणी विधानसभा क्षेत्रातही विविध कार्यक्रमांसाठी त्यांनी चकरा वाढवल्या. मात्र सेना भाजप युती झाल्याने ही जागा भाजपकडेच राहणार. गेल्या 15 वर्षांपासून या ठिकाणी भाजपची एकहाती सत्ता आहे. तर काँग्रेसकडे खा. हंसराज अहिर यांच्या विरोधात त्यांच्या तोडीचा उमेदवार नाही. त्यामुळे काँग्रेसने बाळू धानोरकरांच्या माध्यमातून हंसराज अहिर यांच्या विरोधात टक्कर देण्याची चाल खेळल्याचे बोलले जात आहे. जर बाळू धानोरकरांचा काँग्रेस प्रवेश झाला तर चंद्रपूर लोकसभेची निवडणूक अतितटीची ठरू शकते.

एकीकडे भाजपच्या कार्यक्रमांना मिळणारा सततचा अत्यल्प प्रतिसाद ही मंत्री महोदयाला अस्वस्थ करणारी घटना आहे. तर दुसरीकडे बाळू धानोरकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्याही चिंता वाढवण्याचं काम करीत आहे. बाळू धानोरकर या काही अटींसह प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जर अटी मान्य करण्यात आल्या तर त्यामुळे केवळ लोकसभेचंच नाही तर इतर राजकारणही धवळून निघू शकते. आता पुढे काय घडामोडी घडणार याकडे स्थानिकांचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.