तीन दिवसीय धम्म परिषदचे राजूर येथे थाटात उद्घाटन

विविध विषयांवर चालतील चर्चा, परिसंवाद आणि विविध कार्यक्रम

0

बंटी तामगाडगे, महेश लिपटे, राजूरः वणी तालुक्यातील राजूर येथे एप्रिल महिन्यात 28, 29 व 30 तारखांना धम्म परिषद आयोजित केली आहे. 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिन समारंभा निमित्त आयोजित या धम्मपरिषदेचे उद्घाटन 28 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकराचं पणतू तथा साहित्यिक राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते झाले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भन्ते करुणाशील होते. स्वागताध्यक्ष या नात्याने डॉ. महेंद्र लोढा यांनी धुरा सांभाळली. यावेळी विचारपीठावर प्रमुख वक्ता डॉ. मुन्नी भारती, वणी पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, अशोक वानखडे, वसुंधरा गजभिये, धर्मराज निमसरकर, प्रा. पुरुषोत्तम पाटील व मान्यवर उपस्थित होते.

या धम्म परिषेदेचे उद्घाटक राजरत्न आंबेडकर यांनी बौद्धधम्माची निकड व आजची परिस्थिती यावर सविस्तर चर्चा केली. अनेक दाखले व उदाहरणे देत त्यांनी पटवून दिले की आज जगाला शांततेसाठी बुद्धविचारांची गरज आहे. तथागत गौतम बुद्धांनी ‘‘सब्बे सत्ता सुख्खे होन्तू’’ची म्हणजेच सर्व प्रजा सुखी होवो ही घोषणा दिली. अखिल मानवजातीचे कल्याण हे तथागत बुद्धांचं स्वप्न होतं.

त्यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी दिलेला धम्म आजही सर्वत्र कार्यरत आहे. या धम्मातील जगण्याचं तत्त्वज्ञान आजही तेवढंच उपयोगी पडतं. पंचशील, दहा पारमिता, अष्टांगिक मार्ग व अशा अनेक बाबी मानवी जीवन उदात्त व उन्नत करतात यात शंका नाही. भगवान बुद्धांनी एक लोकचळवळ उभी केली. ती अजूनही सुरूच आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुत्त्वाची मूल्ये हा धम्माचा प्राण आहे. जगात सगळीकडे अंधाधुंदी वाढली आहे. माणूस माणुसकीला पारखा झाला आहे. अशा काळात माणसाला माणूस करण्यासाठी अत्यंत प्रभावी रसायन म्हणजे भगवान बुद्धांनी दिलेले धम्मविचार आहेत.

डॉ. मुन्नी भारती यांनी जगातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. जगात वाढलेली दुष्कृत्ये, अनाचार, मानवी भावनांचा खेळ, मानवी जीवनातील अस्थिरता, अशांती यावर त्यांनी चर्चा केली. या सगळ्यांमधून जर बाहेर पडायचं असेल तर आता तथागत गौतम बुद्धांचे विचार आपण अंगिकारले पाहिजेत.

मानवी जगणं अत्यंत प्रसन्न करणारा असा बौद्ध धम्म असल्याचंही ते म्हणाले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या समाजाचा, देशाचा चांगला अभ्यास होता. त्यांनी एकप्रकारे संशोधन केले. या समाजाला नेमकं काय आवश्यक आहे आणि काय दिलं पाहिजे हे त्यांनी समजून घेतलं. नागपूरच्या दीक्षाभूमिवर झालेला ऐतिहासिक सोहळा ही एका नव्या युगाची नांदी होती.

भगवान बुद्धांचे विश्वकल्याणकारी विचार पुन्हा या देशात पेरण्याची ती एक नवी सुरुवात होती. धम्म समजून घेणं आणि जगणं हे अत्यंत जबाबदारीचं काम आहे. लोककल्याणार्थ हा धम्मातील अमृतरस आपण सगळ्यांना दिला पाहिजे. नंतर डॉ. मुन्नी भारती यांनी अनेकविध विषयांवर प्रकाश टाकला.

स्वागताध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा यांनी भगवान बुद्धांनी दिलेला धम्म हा कसा सार्वलौकिक व सार्वकालिक आहे, यावर चर्चा केली. ते म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्त्व होते. त्यांनी नव्या मानवी पिढींवर अनंत उपकार केलेत. त्यांच्यामुळेच आपल्याला धम्माची ओळख व्हायला लागली. धम्माची शिकवण धम्म ही माणूस म्हणून जगण्याची पद्धती आहे.

ते पुढे म्हणाले की जेव्हा आपण माणूस म्हणून जगतो तेव्हा इतरांनाही माणसासारखी वागणूक देणे म्हणजे धम्म होय. बुद्धांनी सांगितलं होतं की सर्व दुःखाचं मुळ हे तृष्णा आहे. आणि ते दूर करण्यासाठी काय करावे हेच म्हणजे धम्म… बुद्धानी त्यांच्या धम्माद्वारे हे दुःख दुर करण्याची पद्धती समाजाला दिली आहे. आज जेव्हा देशातील परिस्थिती गंभीर आहे. रेप, जातीभेद, ऑनर किलिंग, जातीभेदातून खून, जातीधर्मात विद्वेश, धर्मिक दंगल. अशा गोष्टी बघितल्या की लक्षात येते की देशाला आज धम्माजी गरज का आहे.

त्यामुळे बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार प्रचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमातून जर धम्म लोकांपर्यंत पोहोचला तरच आपण प्रबुद्ध भारताकडे वाटचाल करू… बौद्ध बांधवानी मोठ्या भावाच्या भूमिकेत यावे, असेही आवाहन डॉ. लोढा यांनी केले.

या मुख्य सोहळ्याआधी सकाळी 10 वाजता धम्ममिरवणूक निघाली. त्यात राजूर व परिसरातील अनेक धम्मप्रेमी सहभागी झालेत. उद्घाटन सोहळ्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मनोहरदीप रुसवा आणि सुषमादेवी यांचा बुद्ध-भीमगीतांचा कार्यक्रम झाला. 29 व 30 रोजीेदेखील विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्राचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.