जिल्हा साहित्य संमेलनाचं वाजलं सुप

"भाषेच्या वृक्षाला आलेले गोड फळ म्हणजे साहित्य", प्राचार्य उत्तम रुद्रवार

0 325

 वणी: भाषेची श्रीमंती, भाषेचे सामर्थ्य आणि भाषेचे सौंदर्य साहित्यातून प्रकट होते. ग्रंथ हे संस्कृतीचे रूप असेल आणि पुस्तक हे जर संस्कृतीचे मस्तक असेल तर भाषा हे माणसाचे व्यक्त रूप आहे. आपले विचार, आपल्या कल्पना आणि आपल्या भावना भाषेच्याच माध्यमातून प्रकट होतात. अशा भाषेच्या वृक्षाला आलेले गोड फळ म्हणजे साहित्य होय असे प्रतिपादन वणी येथे आयोजित जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य उत्तम रुद्रवार यांनी केले. वणी येथे पार पडलेल्या जिल्हा साहित्य संमेलनात ते बोलत होते.

 

येथील वसंत जिंनिंगच्या सभागृहात दि.13 ऑगस्ट रोजी जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी पुसद येथील जेष्ठ साहित्यिक प्राचार्य उत्तम रुद्रवार हे होते. या संमेलनाचे उदघाटन जेष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रमाकांत कोलते, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे होते. या प्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे वामनराव तेलंग, विलास मानेकर, शुभदा फडणवीस, प्रदीप दाते, प्रकाश एदलाबादकर , माधव सरपटवार उपस्थित होते.या संमेलनाचे प्रास्ताविक वणी शाखेचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे, यांनी केले.

या साहित्य संमेलनाची सुरुवात जिल्हा ग्रंथालय अधिकारी व नगर वाचनालय यांच्या सौजन्याने यवतमाळ जिल्ह्यातील साहित्यिकांच्या ग्रंथाच्या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ.रमाकांत कोलते यांच्या हस्ते झाले.दीप प्रज्वलनानंतर प्रणिता पुंड, रेणुका अणे, प्रांजली कोंडावर यांनी वणीचे श्रेष्ठ कवी ना.मा. सरपटवार रचित शारदा स्तवन व सुरेश भट रचित मराठी गौरव गीत सादर केले. त्यानंतर शाल श्रीफळ, स्मृती चिन्ह व ग्रंथ भेट देऊन अतिथीचा सत्कार करण्यात आला.

 

स्वागताध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश विजयराव देशमुख यांनी अतिथीचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. त्यानंतर या संमेलनाचे आमंत्रक माधव सरपटवार यांनी वणीच्या साहित्य विश्वाचा आढावा घेतला. प्रमुख अतिथी डॉ.रमाकांत कोलते यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा आनंद व्यक्त केला. प्रमुख अतिथी तारेंद्र बोर्डे यांनी वणी नगर पारिषदेतर्फे साहित्य चळवळीच्या विकासासाठी भरीव योगदान देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामनराव तेलंग, व संमेलन समितीच्या निमंत्रक शुभदा फडणवीस यांनी सम्मेलनाला शुभेच्छा दिल्या.

संमेलनाचे उदघाटक शैलेश पांडे उदघाटनपर भाषण करताना म्हणाले की, साहित्यिकांच्या साहित्यातून समकालीन समाजाच प्रतिबिंब उमटलं नाही तर ते साहित्य होत नाही. साहित्यिकांनी भोवतालचे प्रश्न ओळखून लिहले पाहिजे समाजातील गुंतागुंत ओळखून लिहिणाऱ्या साहित्याची आज गरज आहे. जीवनातील कुरूपात बिभीस्तता मांडण्याचा प्रयत्न नव्या काळातील लेखकांनी केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याची गुंतागुंत साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून प्रकट केली पाहिजे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

(हे पण वाचा: कविता ते संपादकत्व… पांडेजींचा ‘दबंग’ प्रवास… शैलेश पांडे यांची एक्सक्लुझिव मुलाखत)

या उदघाटन कर्यक्रमात उमरखेड येथील कवी दिलीप कस्तुरे यांच्या कस्तुरी गंध या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रुद्रवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे संचालन या साहित्य सम्मेलनाच्या संयोजक गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. अभिजित अणे यांनी केले. रेणुका अणे यांच्या पसायदानाने उदघाटन कार्यक्रमाची सांगता झाली. या साहित्य संमेलनाच्या यशस्वीततेसाठी डॉ . स्वानंद पुंड, राजेश महाकुलकर, राजाभाऊ पाथरडकर, अशोक सोनटक्के, अमोल राजकोंडावर, गजानन भगत, जयंत लिडबीडे यांनी परिश्रम घेतले.

You might also like More from author

Comments

Loading...