सुरकुत्यांना आली हास्याची किनार डॉ. लोढांमुळे….

ज्येष्ठांसोबत वृद्धाश्रमात साजरी केली दिवाळी

0

निकेश जिलठे, वणीः दिवसागणिक खात जाणारं एकाकीपण…. आपल्या जवळच्यांपासून तुटलेले वृद्ध…. कोणताही सण असो उत्सव असो जुन्या पारिवारिक आठवणीत रमताना दिसतात. दिवाळीसारख्या एखाद्या सणाला आलेलं क्षणभर हसू आणि पुन्हा तो एकांतवास असं वृद्धाश्रमातील ज्येष्ठाचं आयुष्य असतं. सुरकुत्या पडलेल्या कित्येक चेहऱ्यांवर हास्याची किनार यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेंद्र लोढा यांनी दुरावलेल्या ज्येष्ठांसोबत दिवाळी साजरी केली.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीपासून 12 किलोमिटर अंतरावर असलेल्या उमरी पठार या गावात संत श्री दोला महाराज वृद्धाश्रम आहे. मागास समाज उत्कर्ष शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित वृद्धाश्रम ट्रस्टचे शेषराव डोेेंगरे तथा शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या वाढत चालल्यात. अनेक निराधार वृद्धांना आधाराची गरज असते. याच गरजेतून इथे वृद्धाश्रम सुरू झाले. किशोरावस्थेपासूनच सामाजिक कार्यात सक्रिय असलेले डॉ. महेंद्र लोढा यांना वृद्धांच्या समस्यांची जाणीव आहे. त्यांनी याच जाणीवेतून अनेक विधायक कार्ये केलीत.

अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजा आहेत. तरीदेखील प्रत्यक्ष सहवासाची आणि जिव्हाळ्याची गरज भासतेच. घरापासून दूर राहणाऱ्यांसोबत घरातील सदस्य होऊन डॉ. लोढा यांनी सगळ्यांची तोंडं गोड केली.

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दिवाळीनिमित्त नवीन कपड्यांचे वाटप केले. ब्लँकेट आणि थंडीचे कपड्यांचीदेखील डॉ. लोढांनी ज्येष्ठांना दिवाळीभेट दिली. घरात साजरी करतो तशीच ज्येष्ठांसोबत फटाके वाजवून अत्यंत आनंदात दिवाळी साजरी केली. डॉ. लोढा यांच्या सोबत दिवाळी साजरी करताना हसू हरवलेल्या, अनेक सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर हास्याची किनार आली. यावेळी डॉ. लोढा यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची सुख-दुःखे जाणून घेतली. वृद्धाश्रमानेदेखील डॉ. लोढा यांचा यावेळी भेटीनिमित्त यथोचित सत्कार केला.

स्वाभिमानीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यावेळी उपस्थितांना दिवाळीच्या सदिच्छा दिल्यात. त्यांच्या पातळीवर ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचंही म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वतोपरी शक्य त्या उपाययोजना करण्याचाही तिवारी यांनी शब्द दिला. ज्येष्ठांसोबत दिवाळी साजरी करण्याचा हा वेगळा आनंद असल्याचंही तिवारी यावेळी म्हणाले.

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने डॉ. लोढा यांनी ज्येष्ठांच्या आरोग्याचा आढावाही घेतला. ज्यांना ऐकायला कमी येतं, त्यांच्यासाठी कानाच्या मशीन्स ते लवकरच उपलब्ध करून देणार आहेत. मोतिबिंदू किंवा डोळ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. लवकरच त्यावर काम होईल.  डॉ. लोढा म्हणाले की, निराधार वृद्धांची समस्या वणीतदेखील आहे. लवकरच वणी परिसरात सर्व सोयींनी युक्त वृद्धाश्रम ते सुरू करणार आहेत. केवळ वस्तू आणि साधनं असलीत की आनंद मिळत नाही. त्यासोबतच जिव्हाळा, आपुलकी आवश्यक असते. प्रत्यक्ष उपस्थित राहून कोणताही क्षण ज्येष्ठांसोबत साजरा केला की तो दिवाळीपेक्षा काही कमी नसतो. ही तर दिवाळीच आहे. त्यामुळे वृद्धाश्रमात साजरी केलेली दिवाळी हा कृतज्ञतेचाच भाग असल्याचं डॉ. लोढा म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.