शिंदोला- कुर्ली शिवारात अपुरा वीज पुरवठा

रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना द्यावे लागते पिकांना पाणी

0

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिंदोला -कुर्ली शिवारातील शेतात गरजेपेक्षा कमी आणि रात्रकाळात वीज पुरवठा होतो. परिणामी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. म्हणून चोवीस तास वीजपुरवठा करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वणी वीज वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिंदोला- कुर्ली शिवारात केवळ आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. तथापि आठवड्यातून तीन दिवस रात्री अकरा वाजता वीज पुरवठा होतो. परिसरातील गावशिवारात चोवीस तास वीज पुरवठा केल्या जात असताना केवळ शिंदोला कुर्ली शिवारात आठ तास वीज पुरवठा करणे हे अन्यायकारक असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. अपुऱ्या वीज पुरवठयामुळे पावसाचा खंड असताना देखील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश पिके सुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्र काळात पिकांना पाणी देताना सर्पदंश होण्याचा धोका संभवतो. तसेच विजेचा धक्का बसण्याचा धोका असतो.

म्हणून वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यानी १५ ऑगस्ट पर्यंत सदर समस्येवर तोडगा काढुन चोवीस तास वीज पुरवठा करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी वणी, ठाणेदार शिरपूर पोलीस आदींना दिली आहेत. निवेदनावर शांतीलाल जैन, कैलास बांदूरकर, हरिभाऊ सूर, रविंद्र भोयर, चांगदेव बांदूरकर, भारत सूर, प्रफुल बांदूरकर, तुकडोजी पिंपळशेंडे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.