Exclusive: दोन गुरू एक चेला, शिक्षणाचा अजब झमेला

1 ते 5 वर्गात एकच विद्यार्थी, शिकवायला शिक्षक मात्र 2

0

रवि ढुमणे, वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवेगाव येथील शाळेत वर्ग १ते ५ मध्ये फक्त एकच विद्यार्थी असून त्यांना शिकवण्यासाठी तब्बल दोन शिक्षक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसंच या ५ वर्गात एकटा असलेला विद्यार्थी मुख्याध्यापकाचा पुतण्या असल्याचे समजते. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची कमतरता आहे, तर दुसरीकडे विद्यार्थी नसताना दोन शिक्षकांची नियुक्ती झालेली दिसून येत आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाने विद्यार्थी नसताना येथील शिक्षकांचे समायोजन का केले नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वणी तालुक्यातील शिरपूर केंद्रात येणारी नवेगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत एकूण ५ वर्ग आहेत. मात्र या १ ते ५ वर्गात फक्त एकच विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्याला शिकवायला मात्र पंचायत समिती वणीच्या शिक्षण विभागाने दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. सदर विद्यार्थी एकटाच असल्याने त्याने शाळा सोडून जाण्याची विनंती केली होती, मात्र मुख्याध्यापकाचा पुतण्या असल्याने त्याला शाळा सोडण्याचा दाखला दिला नसल्याचे बोललं जात आहे.

नुकतेच जिल्हा स्तरावरून शिक्षकाचे समायोजन करण्यात याले आहे. यात येथील शिक्षकांचे पटसंख्या कमी असतांना देखील समायोजन करण्यात आले नाही. याउलट ढाकोरी येथील शाळेत ९० विद्यार्थ्यांना शिकवायला केवळ तीनच शिक्षक आहे. म्हणजे पंचायत समिती शिक्षण विभाग मर्जीतील शिक्षकांसाठी असे उठाठेव करीत असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे पालकाची शिक्षकांची मागणी असताना शिक्षक मिळणे कठीण आहे, तर दुसरीकडे एक विद्यार्थ्याला दोन शिक्षक आहे. यावरून वणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात केवळ किती भोंगळ कारभार सूरू आहे हे दिसून येत आहे. या शाळेतील शिक्षकांचे समायोजन होईल या भीतीने पटसंख्या निर्धारण तर केली नसेल ना?असा प्रश्न देखील उपस्थित जात आहे. एकूणच या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असलेल्या वणी पंचायत समितीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.