झरी तालुक्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट

कार्ड दाखवून, वाहनावर प्रेस लिहून रोब मारण्याचा प्रकार सुरू

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात 106 गावं आहेत. यातील बहुतांश गावात अद्यापही शिक्षणाची गंगा पोहोचलेली नाही. त्यामुळे परिसरात गरिबी आणि अशिक्षिततेचं प्रमाण अधिक आहे. याचाच फायदा घेऊन काही भुरट्या लोकांनी पत्रकारितेच्या नावाखाली दुकानदारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

काही तोतया पत्रकार ज्यांचा पत्रकारितेशी सुतरामही संबंध नाही असे लोक गाडीवर प्रेस लिहून तसेच एखाद्या पेपरचे कार्ड दाखवून शासकीय कार्यालय व व्यावसायिकांकडे जाऊन पत्रकार असल्याचा रोब मारताना दिसत आहेत. तालुक्यातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषि कार्यालय, आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन, शिक्षण विभाग, आश्रम शाळा, बँक व इतर कार्यालयात जाऊन पत्रकार असल्याचे सांगून कर्मचा-यांना धमकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

हे बोगस कार्डधारी पत्रकारांमध्ये तालुक्यातील बहुतांश रॉकेल दुकानदार, कंट्रोल डीलर, किराना दुकानदार, पानटपरी वाले, अवैध वाहतूक करणारे यांचा समावेश आहे. त्यांनी त्यांच्या गाडीवर प्रेस लिहून व खिशात परिसरात कधी न दिसणा-या पेपरचे आयडीकार्ड ठेऊन अधिका-यांना दम देण्यासाठी, त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी व स्वतःचे अवैध व्यवसाय लपवण्यासाठी या कार्डचा वापर होताना दिसत आहे. तर काही तोतया पत्रकार खंडणी वसूल करण्याचं काम देखील करत असल्याची चर्चा आहे. यात कधी ही न निघणा-या किंवा केवळ खंडणी वसूल करण्यासाठी सुरु केलेल्या अनियतकालिक, साप्ताहिक यांचा समावेश आहे.

काही तोतया पत्रकार प्रेसचे कार्ड दाखवून पत्रकार असल्याचे भासवून आपल्या चारचाकीने गुटखा, जर्दा, दारू, याची तस्करी करताना देखील दिसत आहे. तर काही बोगस पत्रकार अवैध व्यावसायिकांकडून ओली पार्टी खात असताना दिसत आहे. या तोतया आणि बोगस पत्रकारांमुळे शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.

ज्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात आहे किंवा ज्यांना पत्रकारितेच्या नावाखाली धमकवलं जात आहे अशा अधिकारी, कर्मचारी इत्यादींनी याची तक्रार पोलिसांमध्ये करून अशा खंडणीबहादुर आणि तोतया पत्रकारांवर आळा घालायला हवा. पोलिसांनी देखील असे खंडणीखोर पत्रकार शोधून त्यांच्यावर अंकुश लावणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.