गाणे… किस्से… कविता… आणि बरंच काही

तीन क्षेत्रांतील कलावंतांचे पहिल्यांदाच रविवारी एकत्र सादरिकरण

0
सुरेंद्र इखारे, वणीः ‘‘गाणे… किस्से… कविता… आणि बरंच काही’’ या शीर्षकाखाली एक अनोखी मैफल गणपती अपार्टमेंट, छोरिया ले आऊट, चिखलगाव, वणी येथे रंगणार आहे. 22 जुलै रविवारी सायंकाळी होणाऱ्या या मैफलीत पत्रकार संतोष कुंडकर यांचं गायन, निकेश जिलठे यांचं मनोरंजक व रोचक किस्से कवितांचं सादरीकरण आणि कवी सुनील इंदुवामन ठाकरे यांचं काव्यवाचन व सादरीकरण होईल.
संतोष कुंडकर हे अनेक वर्षांपासून गायन क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सध्या एका वर्तमानपत्राचे विभागीय प्रतिनिधी आहेत. त्यांच्या गायकीचा आस्वाद आतापर्यंत अनेकांनी घेतला आहे. निकेश जिलठे हे देखील पत्रकार आहेत. त्यांनी मुंबई येथे टीव्ही व डिजिटल मीडियात प्रत्यक्ष काम केले आहे. ते सध्या एका डिजिटल मीडियाचे संपादक आहेत. त्यांच्या अनुभवातील सिने, अन्य मीडियातील किस्से व कवितांचा आनंद रसिकांना घेता येईल. वीस वर्षांहून अधिक काळ कविता आणि निवेदनाच्या क्षेत्रांत कार्यरत सुनील इंदुवामन ठाकरे हे त्यांच्यासह अनेक कवींच्या कवितांचे सादरीकरण करतील. त्यांचा ‘‘जगू कविता: बघू कविता’’ हा कवितांचा कार्यक्रम रसिकांच्या पसंतीचा आहे.
कुंडकर यांचं गाणं, जिलठे यांचे किस्से, कविता आणि ठाकरे यांचं कवितांचं सादरीकरण असा हा त्रिवेणी संगम आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत हे तिन्ही कलावंत पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.