पावती न देताच दुकानदारांकडून घेण्यात आले पैसे

शुक्रवारी शेकडो क्रीडाप्रेमींनी केली मैदानाची सफाई

0

विवेक तोटेवार, वणी: एका खासगी संस्थेेेच्या दांडियाच्या कार्यक्रमाला शासकीय मैदानात परवानगी दिल्याने प्रकरण आधीच तापलेले असताना आता मैदानात लावण्यात आलेल्या दुकानाबाबत दुकानचालकांकडून कोणतीही पावती न देता पैसे घेतल्याने एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यातच सकाळी दुकानामुळे झालेला कचरा साफ करण्यास कुणीही आले नसल्याने क्रीडाप्रेमींनीच मैदानाची सफाई केली. मैदानाच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मैदान केवळ पैसे कमवण्याचं केंद्र बनलं आहे का? असा सवाल क्रीडाप्रेमींनी उपस्थित केला आहे. दरम्यान दांडिया कार्यक्रमाला दिलेली परवानगी नाकारावी ही मागणी घेऊन क्रीडाप्रेमींनी तहसिलदार आणि एसडीओंची भेट घेऊन निवेदन दिले.

गुरुवारी क्रीडाप्रेमींनी मैदानावर दहा दिवसांसाठी दांडियाला दिलेली परवानगी नाकारावी तसेच कोणत्याही क्रीडा व्यतिरिक्त इतर कार्यक्रमाला परवानगी देऊ नये यासाठी आमदारांची भेट घेतली होती. मात्र भेटीमध्ये आमदारांनी कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवस मैदानावर मूर्तीकांरांच्या दुकानासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी दुकानदारांकडून प्रत्येकी 100 रुपये घेण्यात आले. याची कोणताही पावती दिली गेली नाही. एका दुकानदाराने पावती मागितल्यावर त्याच्यासोबत हुज्जत घालण्यात आली असा आरोप एका दकानदाराने ‘वणी बहुगुणी’जवळ बोलताना केला.

जर खेळाव्यतिरिक्त इतर कार्यासाठी मैदान दिले जात असेल तर त्या कार्यानंतर मैदान ‘जैसे थे’ करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र मूर्तीकारांचे दुकान उठल्यानंतर सकाळी मैदान साफ करण्यासाठी प्रशासनातर्फे कुणीही मैदानात फिरकले नाही. त्यामुळे शेकडो क्रीडाप्रेमींनी स्वतःच पुढाकार घेऊन मैदानातील कचरा गोळा करून मैदान साफ केले. मैदान पैसे घेऊन भाड्याने द्यायचे, मात्र त्याची देखभाल करायची नाही असा सवाल उपस्थित करत क्रीडाप्रेमी संताप व्यक्त करत आहे.

एक किंवा दोन दिवसांसाठी मैदान इतर कार्यासाठी देण्यास क्रीडाप्रेमींचा विरोध नाही. मात्र दांडियासाठी तब्बल दहा दिवसांसाठी दांडियासाठी मैदानाची परवानगी दिल्याने क्रीडाप्रेमी संतप्त झाले आहे. आधीच मैदानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यातच इतर कार्यानंतर झालेला कचरा देखील क्रीडाप्रेमींनाच साफ करावा लागत आहे. मग प्रशासनाची जबाबदारी काय असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत.

तहसिलदार आणि एसडीओंना निवेदन देताना क्रीडाप्रेमी

डिसेंबर महिन्यात पोलीस भरती आणि सैन्य भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे हे दिवस सरावासाठी महत्त्वाचे आहेत. या मैदानावर फिजिकल फिटनेसचे ट्रेनिंग घेऊन शेकडो मुलं मुली पोलीस आणि सैन्य दलात भरती झाले आहे. खेळाव्यतिरिक्त इतर कार्याला मैदान भाड्याने दिल्याने त्यांच्या सरावात खंड पडतो. त्याचे मोठे नुकसान सोसावे लागते. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती पावलं उचलावी अशी अपेक्षा पोलीस भरती आणि सैन्य भरतीची तयारी करणारे विद्यार्थी व्यक्त करीत आहे.

‘वणी बहुगुणी’शी बोलताना एक क्रीडाप्रेमी म्हणाले की…

एक दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी विरोध नाही मात्र दहा दिवस सरावात खंड पडणे ही नुकसानदायी बाब आहे. दांडिया खेळताना पायांना त्रास होऊ नये यासाठी तिथे माती टाकली जाते. शिवाय तिथे विविध स्टॉल लावण्यात येते. या कारणाने मैदानाचे मोठे नुकसान होते. शिवाय कार्यक्रम झाल्यानंतर त्याची देखभालही कुणी करत नाही. त्यामुळे मैदानाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दांडियाला किंवा खेळाव्यतिरिक्त इतर कार्यासाठी मैदान देण्यास विरोध असणार. अशी प्रतिक्रिया दिली.

शुक्रवारी क्रीडाप्रेमींनी खेळाव्यतिरिक्त कोणत्याही कार्यासाठी मैदान देऊ नये ही मागणी घेऊन तहसिलदार आणि एसडीओ यांना निवेदन दिले. काल गुरुवारी आमदारांची भेट घेतल्यावर आमदारांकडून कोणत्याही प्रकारचे ठोस आश्वासन न मिळाल्याने कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम होऊ देणार नाही या भूमिकेवर क्रीडाप्रेमी ठाम आहे. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.