गुटखा तस्करीला चावलांची साथ

मांगली बनला तस्करीचा मुख्य अड्डा

0

सुशील ओझा, झरी: राज्यात गुटखाबंदीचा कायदा लागू असतानाही पोलीस व अन्न, औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुटख्याची तस्करी केली जात आहे. झरी तालुक्यातही गुटखा तस्करी आणि विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. त्याला चावलांची साथ असून प्रशासन धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याने शासनाच्या गुटखाबंदीचा बोजवारा उडाला आहे.

झरी तालुक्यात सुंगधित तंबाखूसह गुटखा तस्करी प्रचंड वाढली आहे. तरुणांसह वयोवृद्धाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या गंभीर बाबीकडे पोलीस व संबंधित विभाग अर्थकारणातून गप्प असल्याची चर्चा आहे. यापूर्वी कारंजा येथील ‘फिरोज’ नामक गुटखाकिंगने संपूर्ण जिल्ह्यासह झरी तालुक्यात आपले जाळे पसरविले आहे. त्याच्या माध्यमातून वरोरा येथून तालुक्यातील मांगली येथे मारोती व्हॅनद्वारे गुटख्याचा पुरवठा होत आहे.

संपूर्ण तालुक्याला मांगली येथूनच गुटखा सप्लाय होत असल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्त ५०० रुपये रोजीचा माणूस ठेऊन दुचाकीने तेलंगणातही या गुटख्यांची तस्करी सुरू आहे. मांगली गुटका तस्करीचे मुख्य केंद्र असून कारंजा, वरोरा येथील गुटखा तस्करांना चावला नामक व्यक्तीची साथ लाभली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

राज्य शासनाने गुटखाबंदी केली आहे. परंतु तालुक्यातील प्रत्येक पानटपरीवर खुलेआम माजा, गुटखा विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामुळे गुटखाबंदीचा फज्जा उडाला आहे. तालुक्यात लहान मोठे शेकडो पानटपरीचालक आहे. प्रत्येक टपरीवर गुटख्याच्या पुड्या लटकून ठेवण्यात आल्या आहे. पाटण, मांगली व मुकुटबन येथील काही किराणा दुकानदारांनी ३१० रुपयांप्रमाणे एक डब्बा आणून ५१० रुपयांप्रमाणे विक्रीचा गोरखधंदा चालविला आहे.

याबाबतची माहिती पोलिसांना असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती आहे. तसेच सदर तस्करांना वरिष्ठांचेही पाठबळ लाभले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे गुटखा तस्करीला चांगलेच उधाण आले आहे. तालुक्यात सहा दुकानदार या व्यवसायात उतरले आहे. पानटपरीवर त्यांच्याकडून गुटख्यांचा पुरवठा केला जात आहे. मांगलीतील मुख्य गुटखा तस्कर तालुक्यातील अनेक ठिकाणावर गुटखा सप्लाय करतो. एकूणच गुटखाबंदी तालुक्यावर कागदावरच असून, पोलिसांकडून एकही कारवाई होत नसल्याने शंका उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.