वणी तालुक्यातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

बोरगाव, शिरपूर, खांदला, नवेगाव, गोपालपूरच्या शेतकऱ्यांचा सहभाग

0

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील वृक्ष तोडीमुळे जंगले विरळ झाली. परिणामी वन्यप्राण्यांचा शेतात शिरकाव वाढला. पिकांचे नुकसान होऊ लागले. वनविभागाकडे वारंवार वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी करूनही उपयोग झाला नाही. खंडित वीज पुरवठा नियमित झाला नाही. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, सततची नापिकी, सरकारचं दुर्लक्ष अशा अनेक समस्यांनी शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे विविध मागण्या घेऊन वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

वणी तालुक्यातील शिरपूर, शिंदोला शिवाराला मेंढोली, कुर्ली बीटचे जंगल लागून आहे. अतिक्रमित शेतीसाठी जंगलाची प्रचंड तोड झाली. त्यामुळे वन्यप्राण्यांचे निवासस्थान नष्ट झाली. वन्यप्राणी चारापाणी मिळविण्यासाठी शेतात शिरकाव करतात.परिणामी पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. म्हणून वन्यप्राण्यांपासून शेतमालाचे रक्षण शासनाने करावे. अन्यथा वन्यप्राण्यांना ठार मारण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी. अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

शेतीसाठी वीजपुरवठा नियमितपणे करावा. स्वामिनाथन आयोग लागू करावा. सरसकट कर्ज माफी देण्यात यावी. सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकरी हिताचे जे मुद्दे होते, त्याला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना न्याय ध्यावा. आदी मागण्या घेऊन बोरगाव, शिरपूर, खांदला, नवेगाव, गोपालपूर अशा ११ गावातील शेतकरी ग्रामपंचायतच्या आवारात उपोषणाला बसले आहे.

शिरपूर येथे उपोषणाला बसलेले शेतकरी

बोरगाव येथील सुधाकर धांडे, शंकर तिवाडे, छबन सावे, चिंतामण घुगुल तर शिरपूरचे मारोती बोडे, भीमराव माहुरे, विठ्ठल बारसागरे यांचा समावेश आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांची त्वरित पूर्तता करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा आंदोलकानी दिला आहे. वनविभाग व शासन काय भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.