Video: आपटी घाटात अवैध वाळू उपसा, शासनाला कोट्यवधींचा चुना

महसूल विभागाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, 'वणीबहुगुणी'च्या हाती आला एक्सक्लुझिव व्हिडीओ

0

रवि ढुमणे, वणी: वणी उपविभागातील मारेगाव महसूल विभागाच्या हद्दीत येणाऱ्या आपटी घाटातील वर्धा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होतोय. या वाळू उपशाचा एक्सक्लुझिव व्हिडीओ ‘वणीबहुगुणी’च्या हाती आला आहे. राजरोजपणे सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अवैध वाळू उपशाला मारेगाव महसूल विभागाचं पाठबळ तर नाही असा प्रश्न उपस्थित होतोय.

वनोजा देवी ते आपटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर गोरज, दांडगाव, आपटी ही गावे आहेत. या गावातील शेतकरी,विद्यार्थी आणि सामान्य जनता याच मार्गाचा जाण्या येण्यासाठी वापर करतात. यवतमाळातील वाळू कंत्राटदार असल्यानं आपटी घाटातील वाळू थेट यवतमाळ जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोहचविल्या जाते. घाटापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दांडगाव येथील खुल्या जागेवर हजारो ब्रॉस वाळूचा साठा करण्यात आला आहे. तर पात्रातील वाळू काढण्यासाठी भल्यामोठ्या पीसी यंत्राचा वापर करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरू असल्यानं तहसीलदार विजय साळवे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे.


याबाबत मारेगाव तहसीलदार विजय साळवे याना विचारणा केली असता असा प्रकार कुठेच नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र वाळू उपशाचा एक्सक्लुझिव व्हिडीओ वणीबहुगुणीच्या हाती लागला आहे. यात नदीपात्रात वाळू उपसा करतांना, क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून नेणारी वाहने आणि ५ किलोमीटरवर अंतरावर असलेल्या दांडगाव येथे साठवणूक केलेला अवैध वाळूसाठा दिसत आहे.

वाळू वाहतूक करण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा वापर होत असल्यानं येथील रस्त्याची देखील पूर्णतः वाट लागल्याचं बघायला मिळतंय. परिणामी या रस्त्यानं सायकल, दुचाकीनं आणि पायदळ जाणारे विद्यार्थी, कर्मचारी आणि सामान्य जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

अवैध वाळू उपशामुळे शासनाचं कोट्यवधींचं नुकसान होत आहे. महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या अवैध वाळू उपसा प्रकरणात वरिष्ठ पातळीनं लक्ष घालून खनिज संपत्तीचं रक्षण करणं आणि महसूल बुडीला जबाबदार असणा-यांवर कारवाई होणं गरजेचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.