अवैध दारूविक्रीबाबत भडकल्या करणवाडीच्या महिला

महिला आणि सेनेतर्फे दोन तास रास्ता रोको आंदोलन

0

सागर मुने, नागेश रायपुरे मारेगाव: करणवाडी येथील अवैध दारूविक्री बंद व्हावी यासाठी महिलांनी रणशिंग फुंकले असून आज महिलांनी उग्र रुप धारण करत दोन तास रास्ता रोको केले. यावेळी शाळेच्या चिमुकल्याही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. रास्ता रोको केल्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर तिथे पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांनी पोहोचून आश्वासन दिल्यानंतर या महिला शांत झाल्या.

मारेगाव तालुक्यातील करणवाडी गावातील शाळेजवळ अवैधरित्या दारू विक्री होते. ती बंद करण्यात यावी यासाठी तिथल्या महिलांनी ती बंद करावी या करिता वेळोवेळी निवेदन दिले. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. अखेर या विरोधात शिवसेनेने पुढाकार घेतला. करणवाडी येथील महिलांनी युवासेना आणि सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना सोबत घेत दुपारी दोन तास रास्ता रोको केला.

महिलांची समजूत काढण्यासाठी मारेगावचे ठाणेदार घटनास्थळी पोहोचले. मात्र महिलांनी त्यांनाच धारेवर धरले. यावेळी पोलिसांच्या आशीर्वादामुळेच गावागावात अवैध दारूविक्री होत असल्याचा आरोप महिलांनी केला. परिस्थिती गंभीर होत असल्याने अखेर तिथे पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांना बोलावण्यात आलं.

विजय लगारे यांनी दोन दिवसांत तालुक्यातील सर्व अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर महिला शांत झाल्या. जर दोन दिवसांत कार्यवाही झाली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी महिलांनी दिला.

या आंदोलनात मोठ्या संख्येने करणवाडी येथील महिला तसेच चिमुकल्या विद्यार्थीनीही सहभागी झाल्या होत्या. यावेळी सेनेचे संजय निखाडे, गणपत लेडांगे, गजानन किन्हेकर, आशिष खुलसंगे, विजूभाऊ मेश्राम, राजू तुराणकर. सचिन पचारे, विशाल किन्हेकर, तुकाराम वासाडे, मधू वरतकर, अनिल राऊत, राजू मोदाडे, राजू खडसे, दत्तू अवताडे, सुधीर थेरे, सुमीत हेपट यांच्यासह सेना आणि युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.