अवैध दारूविक्रेत्यांची महिलांना जबर मारहाण

पोलिस वाहनावरही केली दगडफेक

0 2,244

विलास ताजने, वणी: अवैध दारू विक्री करताना पकडलेला मुद्देमाल घेऊन पोलिसात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या महिलांना दारू विक्रेत्यांनी रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना वणी तालुक्यातील कुरई येथे दि. ८ शुक्रवारी रात्री आठ वाजता घडली. सदर घटनेची फिर्याद वाहन चालक शालिक वाघाडे यांच्यासह ढाकोरी येथील रंजना वसंता ताजने (वय३५) यांनी शिरपूर पोलिसात दिली.

शिरपूर पोलिस ठाण्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या ढाकोरी येथील महिलांनी गावात दारू विक्री करताना विक्रेत्यांना मुद्देमालासह शुुुुक्रवारी रात्री पकडले. मात्र आरोपी घटनास्थळावरून पडून जाण्यात यशस्वी झाले. सदर महिला गावातील चारचाकी वाहनाने शिरपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी जात असल्याची कुणकुण आरोपींना लागली. तेंव्हा महिलांना घेऊन जाणारे वाहन कुरईच्या बस थांब्याजवळ आरोपी टोळक्यानी अडवले.

यावेळी वाहन चालक शालिक वाघाडे यांच्यासह रंजना वसंता ताजने, रंगुबाई बंडू भोस्कर, छाया भैयाजी बलकी, त्रिवेनाबाई हरिदास कोडापे, सपना सुरेश सातपुते, किरण सुनिल काकडे या महिलांना आरोपींनी वाहनातून ओढून शिवीगाळ करित बेदम मारहाण केली. यात रंजना ताजने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अन्य महिला किरकोळ जखमी झाल्या.

जखमींना गावातील लोकांनी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. सदर प्रकाराची माहिती शिरपूर पोलिसांना भ्रमणध्वनी वरून माहित होताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच आरोपीनी स्वतःचे दुचाकी वाहन स्वतःच जाळले. यावेळी आरोपी आणि ग्रामस्थात तुफान दगडफेक झाली. पोलिस संतप्त जमावाला शांत करण्याचे प्रयत्न करीत असताना आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण करीत पोलिसांसह ग्रामस्थांवर दगडफेक केली.

पोलिस वाहन क्र. एम.एच. २९ एम ९६५७  या वाहनाच्या काचा फुटून अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. यावेळी पोलिसांचे वाहनही उलटविले. यावेळी संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. मात्र सदर दारू विक्रीला पोलिसांचेच पाठबळ असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत होते. परिणामी पोलिसांनाही ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करीत माघारी परतावे लागले. दरम्यान काही आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता पाहून पोलिसांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर प्रकाराबाबत अवगत केले. उपविभागातील वणी, मारेगाव,  शिरपूर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करून रात्री उशिरापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणली. सदर घटनेत आरोपी आरिफ शेख, आसिफ शेख, हाफिज शेख यांना पोलिसांनी अटक केली. तर फरार आरोपी प्रशांत वासेकर, विलास तेलंग, लोखंड्या यांच्यासह सर्व आरोपी विरुद्ध कलम ३२३, ३२४, ३२६, ३३२, ३३६, ३४१, ३५३, ४२७, १४३, १४७, १४८, १४९ अंतर्गत गुन्हे दाखल केले.

सदर गुन्ह्याचा तपास एम राजकुमार पोलीस अधीक्षक यवतमाळ व सुशील कुमार नायक उपविभागीय पोलिस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सतीश चवरे, पोलीस उपनिरीक्षक सतीश दोंकलवार व पोलीस स्टेशन शिरपूरची चमू करीत आहेे.

फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिस करीत आहे. सध्या कुरई, ढाकोरी गावात शांतता असून शिरपूर पोलिस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. यापूर्वी सदर अवैध दारूविक्रीला पायबंद घालण्यासाठी शिंदोला, कुरई आदी ग्रामस्थांनी मागणी केली होती. महिलांनी आंदोलने केली. मात्र पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मागणीची वेळीच दखल घेतली असती तर सदर घटना घडलीच नसती, असे मत परिसरातील लोकप्रतिनिधींंनी वणी बहुगुणीशी बोलताना व्यक्त केले.

mirchi
Comments
Loading...