25 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गजाआड

5 लाखांचा पहिला हप्ता घेताना रंगेहात अटक

0

बहुगुणी डेस्क, यवतमाळ: 25 लाख रुपयांची लाच मागितल्याा प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाने पोलिस दलातील लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या आणि इतर दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद काशिनाथ कुलकर्णी (48), सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप प्रभाकर चव्हाण (36) आणि सुनिल विठ्ठल बोटरे (40) असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नावं आहेत. मुकुंद कुलकर्णी हे एक वर्षाआधी वणी पोलीस स्टेशन येथे ठाणेदार पदावर कार्यरत होते.

निरीक्षक मुकूंद कुलकर्णी हे यवतमाळ पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) कार्यरत आहेत. तक्रारदाराला गुन्हयाचा तपास तकलादू करणे, कमजोर चार्जशीट तयार करणे, जप्‍त असलेला माल सोडणे, अधिक माल जप्‍त न करणे, तसेच दाखल गुन्हयातील कलमे कमी करणे आणि तक्रारदाराच्या भावाकडून घेतलेली शेतीची खरेदी, चेक्स, परत करण्यासाठी कुलकर्णी, चव्हाण आणि पोलिस कर्मचार्‍याने 25 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. या विरोधात तक्रारदाराने यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर अमरावती विभागाचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कारवाईचा आदेश दिला.

अमरावती विभागातील तसेच यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस अधीकार्‍यांनी सापळा रचला. आज दुपारी साडे बाराच्या सुमारास यवतमाळ येथील चिंतामणी पेट्रोल पंपजवळ मागणी केलेल्यापैकी 5 लाख रूपये स्विकारताना पोलिस नाईक सुनिल बोटरेे यांना अटक करण्यात आली. ही लाच आपण पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्याकरिता स्वीकारल्याचे त्याने एसीबीला सांगितले. वर्षाच्या सुरवातीलाच अशा प्रकारची मोठी कारवाई झाल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

कळंब येथील एका जिनिंगमध्ये काही महिन्यांपूर्वी पोलीस व कृषी विभागाने संयुक्त धाड घातली होती. तेथून संशयास्पद खते, बियाणे व कीटकनाशके असा ६१ लाखांचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात कळंब पोलीस ठाण्यात थोटे बंधूविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला गेला. या प्रकरणी कमजोर चार्जशिट दाखल करणे, गुन्हयाचा तपास तकलादू करणे, कमजोर चार्जशीट तयार करणे, जप्‍त असलेला माल सोडणे, अधिक माल जप्‍त न करणे, कलमे कमी करणे आणि तक्रारदाराच्या भावाकडून घेतलेली शेतीची खरेदी, चेक्स, परत करण्यासाठी कुलकर्णी, चव्हाण आणि पोलिस कर्मचार्‍याने 25 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. 20 लाखात ही डिल फायनल झाली होती. त्याचा पहिला पाच लाखांचा हप्ता आज देण्यात आला. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक पंजाबराव डोंगरदिले, पोलिस उपाधीक्षक गजानन पडघन, कर्मचारी श्रीकृष्ण तालन, सुनिल वराडे, चंद्रकांत जनबंधू, अभय वाघ, महेंद्र साखरे, शैलेश कडू यांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.