बाळ चोरी प्रकरण: तिघांना पोलीस कोठडी तर दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी

बाळ चोरीचे असल्याची दाम्पत्याला कल्पनाच नव्हती

0

रवि ढुमणे, वणी: बाळ चोरी प्रकरणात आता आणखी एक माहिती समोर आली आहे. बाळ चोरून दिले असल्याची पुसटशीही कल्पना बाळ विकत घेणाऱ्या दाम्पत्याला नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणातील बाळाला अपहरण करून विकणाऱ्या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर बाळ चोरी करून आपल्याला दिले आहे याबाबत अनभिज्ञ असलेल्या दाम्पत्याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. वणीच्या ग्रामीण रुग्णालयातून तेथेच रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराने संगनमत करीत दोन दिवसांच्या बाळाचे अपहरण करीत त्याला विकल्याची घटना घडली होती. पोलिसात तक्रार दाखल होताच अवघ्या काही तासातच वणी पोलिसांनी बाळाचा शोध लावून बाळाला आईकडे सुपुर्द केले होते.

 

मंगळवारी रात्री दीड वाजताचे सुमारास वणीच्या ग्रामीण रुग्णालयात गोंडस बाळाला जन्म देणारी नुसरत बाळाला घेऊन गाढ झोपली होती.  रुग्णालयात सर्वच सुरक्षित आहे या भावनेने सर्वच बिनधास्त होते.  मात्र तेथेच सफाईचे काम करणारा गणेश वाघमारे याने त्याच्याच दामले फैल वार्डात असलेल्या श्रीकांत चुणारकर, या दोघांनी संगनमत करून पहाटे तीन वाजताचे सुमारास  ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झालेल्या नुसरत या महिलेच्या कुशीत झोपलेले बाळ पळविले होते. या दोन आरोपींनी दामले फैल भागातील रमेश केशव कुंभारकर यांचेशी संपर्क करून ते बाळ रमेशच्या मदतीने रमेशचा आंध्र प्रदेशातील साळा राजू रामलू बडावत व त्याच्या पत्नीला दिले. हे करताना बाळ चोरीचे असल्याचा तिळमात्र संशय येऊ न देता साठ हजार रुपयात बाळाचा सौदा केला. त्यापैकी तीस हजार रुपये प्रथम घेण्यात आले होते. सदर दाम्पत्य बाळाला घेऊन आंध्र प्रदेशात रवाना झाले होते.

पहाटे नुसरतला जग आली तेव्हा बाळ जवळ दिसले नाही. रुग्णालयात एकाच कल्लोळ झाला. बाळाची शोधाशोध सुरू झाली. पोलिसात तक्रार दाखल केली. प्राथमिक माहितीवरून पोलिसांनी गणेश वाघमारे व त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता बाळ चोरून नेल्याची कबुली दिली. लागलीच पोलिसांनी  बाळाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून सतर्कता बाळगत बाळाच्या शोधात आंध्र प्रदेशात रवाना झाले अन अवघ्या काही तासातच बाळाला मातेच्या कुशीत दिले.

पोलिसांनी लगेच गणेश, श्रीकांत, रमेश व राजू आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन कारवाई केली. गुरूवारी या पाच ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने गणेश, श्रीकांत, रमेश या तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर या बाळ चोरी प्रकरणात अनभिज्ञ असलेल्या बडावत दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.