पीकअपची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा मृत्यू

चालकाची अमानुषता, रुग्णालयात नेताना जखमीला फेकले रस्त्यावर

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका पीक अप वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत इसम जखमी झाला. जमलेल्या लोकांनी त्याच पीकअप वाहनात जखमीला टाकले व रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. परंतु या वाहन चालकाने जखमीला मध्येच रस्त्यावर फेकल्याचा संंतापजनक प्रकार समोर आला आहे. यातच त्या इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

रविवारी सकाळी 10.30 वाजता एक इसम आपल्या दुचाकी वाहन (MH 34 AX 48) या वाहनाने वरोरा मार्गे जात होता. वाटेतच त्याच्या वाहनाला पीकअप वाहनाने (Mh 40 Y 2602) धडक दिली. या धडकेत दुचाकी वाहन चालकाला डोक्याला गंभीर इजा झाली. लवकरच घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली.

याच वेळी नेहमीप्रमाणे भाजीपाला विकून आपल्या गावाला जाणाऱ्या विठ्ठल पद्माकर डाखरे यांनी हे पाहिले. काही जणांनी पीकअप वाहन चालकाला त्या जखमीस रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तीन चार जणांनी जखमीला वाहनात टाकले. वाहन वणीच्या दिशेने रवाना झाले.

दुसऱ्या दिवशी विठ्ठल जेव्हा वणीला आले त्यावेळी टर्निंग पॉईंट बार जवळ त्यांना गर्दी दिसून आली. त्यांनी बघितले असता तिथे एका इसमाची डेथ बॉडी होती. इसम हा रविवारच्या अपघातातील इसम असल्याचे त्यांनी त्याच्या घातलेल्या कापड्यावरून ओळखले. या इसमाचा मृत्यू झाला होता. विठ्ठल हे वडगाव येथील पोलीस पाटील असल्याने त्यांनी वणी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली.

त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 279, 304(अ) सहकलम 134/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पीक अप वाहन वरोरा येथील असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली आहे. वणी पोलीस सदर वाहनाचा शोध घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.