मुलीच्या जन्माने बाप झाला कवी!

"ऊर्जाविश्व" या कवितासंग्रहाचे प्रकाशन

0

ब्युरो, अमरावती: एकीकडे स्त्री भृण हत्यासारखे वास्तव अतीउच्च शिखरावर असताना, आपल्या मुलीच्या जन्माने आनंदाने भारावलेल्या विकास बांबलने एक नाही, दोन नाही तर चक्क शंभरपेक्षा जास्त दर्जेदार कविता करून समाजातील वास्तवावर बोटच ठेवले. नाही तर आजचा शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणूस तसेच आजच्या तरूणाईला सजग करणारा कवी म्हणून साहित्य क्षेत्रात पदार्पण करणार कवी ठरला आहे.

 

 

ज्या  ‘ऊर्जा’च्या जन्माने कवीला ऊर्जा मिळाली त्या ‘ऊर्जा’चा जन्म  १४ मे २०१७ ला जागतिक मातृदिनाच्या दिवशी झाला. आपल्याला मुलगीच जन्माला येवो अशी आस लावून बसलेल्या विकास आणि नम्रता बांबल या दांम्पत्याला जन्म होताच ‘ऊर्जा’ ने नम्रता बांबलला जगातील सर्वात मौल्यवान असलेली आई ही पदवी बहाल केली. बापाला कवी बनविले. अशा या  ‘ऊर्जा’ च्या पहिल्या जन्मदिवसाच्या निमित्तानेच कवी झालेले विकास बांबल या बापाने तयार केलेल्या गेल्या वर्षभरातील सुमारे शंभर पेक्षा अधिक कवितांचे “ऊर्जाविश्व” या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

 

 

“लिखाण हे झब्बूशाहीसाठी किंवा नाव कमवण्यासाठी नसावे तर त्यातून समाजाला नवी दिशा, नवी उमेद मिळायला हवी” असे साहित्याविषयीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रभावित असलेल्या या कवितामध्ये कवीने  समाजातील वास्तवचित्रण रेखाटणाऱ्या कविता लिहिल्या आहेत. यामध्ये हुंडाबळी, हमीभाव, शेतकरी, आत्महत्या, खेड्यांची दुर्दशा, भरटकेलेली तरुणाई, व्यसन, अंधश्रद्धा, कुटुंब, देव, दुष्काळ, जातीयवाद, देशभक्ती, अशा अनेक दर्जेदार कवितांचा “ऊर्जाविश्व “हा कवितासंग्रह अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रमाचे सरचिटणीस जनार्दन बोथे गुरुजी यांच्या अध्यक्षेत, डॉ सतीश तराळ, प्रा डॉ मंदा नांदूरकर, प्रा डॉ प्रमोद गारोडे, गझलकार नितीन देशमुख या साहीत्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

ऊर्जाविश्व कवितासंग्रहाचे कव्हर

“ऊर्जाविश्व ” हे नाव कवीच्या घरात असलेल्या ‘ऊर्जा ‘आणि ‘ विश्वा’ दोन मुलींच्या नावांवरून ठेवण्यात आले. आपल्याच नाही तर एकंदरीत स्री या जातीचा आदर सन्मान करणारा हा कवी मुलीला खरा  वंशाचा दिवा आहे असे मानतो आणि तसे विचार त्यांच्या लेखणीतून समोर आणतो.

“जोवर डोक्यावर आभाळाच छत,”

“माणुसकीच धर्म मोठा, हेच माझं मत”

अशी माणुसकी धर्म सांगणारी कविता, तर “सीमेवर मरणारे भगतसिंग तयार होत आहे, परंतु डॉ कलाम होणाऱ्यांची संख्या घटत आहे” अशी आजच्या उच्चशिक्षित तरुणांना जे पैशाच्या मोहापायी देशाबाहेर जातात त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे.

 

 

“वांझोटी माय” ने तर आजची आळशी झालेली तरुण पिढी तर “भगवे हिरवे निळे बहुत झाले मावळे, कृतिशून्य विचारांचे हे कधी काढतील जावळे” या ओळींनी चपराकच दिलेली आहे. शिक्षणाच्या नावाखाली लफडी होती हजार, नका होऊ परशा नका होऊ आर्ची, थोडी तरी असू द्या काळजी आपल्या घरची या कवितांतून बाहेरगावी शिकायला आलेल्या मुलांना भरकटण्यापासून सावधानतेचा इशारा केलेला आहे.

 

“शेती म्हणजे झाला आता मौत का कुँवा,

लावला कितीकही पैसा तरी हारणारा जुवा”

“ओस पडत चाललंय माझं खेड गावं”

 

अशा कवितेतून शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याचा केलेला प्रयत्न अतिशय सुंदर केलेला आहे.

 

आजही हुंड्यापायी मुली घरातच आहेत बसून,

 

हुंडा घेत नसल्याचे लोक सांगतात चारचौघात ठासून”

या कवितेतून हुंडाबळी प्रथेवर आघात केलेला दिसून येतो,

 

“बहीण पाहिजे बांधायला राखी,

प्रेमासाठी आवश्यक असते एक तरी सखी”

 

या कवितेतून भ्रूणहत्येवर प्रकाश टाकलेला आहे.

 

“राष्ट्रभक्तीची आता व्याख्या बदलली पाहिजे,

 

प्रत्येकाने आपली कर्तव्ये चोख बजावली पाहिजे” असा तरुणांना दिलेला संदेश खरी राष्ट्रभक्ती कशात आहे हे सांगणारा आहे.

 

“एकच पोळी शिल्लक असतांना, घरातल्या देवाला भूक कधीच लागत नाही”

 

या ओळीतून आई वडिलांचं आपल्या मुलांविषयीच निस्सीम प्रेम कवीने व्यक्त केले आहे. काळजी करणारा बापाला आजची तरुणाई डोक्याला झालेला ताप समजत आहे याचे दुःख त्यांनी काळजी करणारा बाप डोक्याचा ताप झाला आहे यातून व्यक्त केले.

 

 

सेल्फीने आजकाल जात असलेले जीव त्यांनी सेल्फी या कवितेतून मांडलेले आहे.

आजच्या तरुणपिढीशी, समाजाचे वास्तव चित्रण रेखाटन करणाऱ्याच कवितांचा ऊर्जाविश्व या कविता संग्रहात समावेश असल्याने सोशल मीडियावर अग्रेसीव होत चाललेली पिढीला वळण योग्य दिशा, ऊर्जा देण्याचे काम ऊर्जाविश्व कवितासंग्रह करणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.