फक्त अर्ध्या तासांत पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या आणि…….

वणीतील नाट्यमय लुटींचा केला पर्दाफाश

0

विवेक तोटावार, वणीः आपण आपल्या कामाने कुठे जात असताना, पोलिस अडवतात. पोलिस म्हटल्याबरोबर सामान्यजनांचा असाही गोंधळ उडतोच. ते खरे आहेत, की खोटे आहेत हेदेखील या गोंधळात आपण तपासत नाहीत. एक सामान्य नागरिक. काहीतरी कामासाठी वणीला येतो. आपल्या गावाला परतत असताना, असेच पोलिस म्हणून अचानक कुणीतरी समोर येतात. त्यांच्या जवळील रक्कम बळजबरीने हिसकावून घेतात. ते तोतया पोलिस फरार होतात. काय करावं नि काय करू नये अशाच अवस्थेत हा फिर्यादी पोलिसांत रिपोर्ट देतो आणि घटनाचक्राला नाट्यामयरीत्या सुरुवात होते. ही घटना जिल्ह्यात पहिल्यांदाच निकाली लागलेली असते, तेही वणी पोलिसांच्या कामगिरीमुळे.

वणी हे तालुक्याचे ठिकाण. त्यामुळे पंचक्रोषीतील सगळेच वणीत मोठी बाजारपेठ व प्रशासकीय कार्यालयाचं ठिकाण म्हणून नियमित येतात. असेच कळमना बु. येथील श्यामराव बापुराव क्षीरसागर हे वणीला आपले नातेवाईक राम लक्ष्मण राजूरकर यांच्या कामानिमित्त वणीला आले. काम झाल्यावर ते निवांत आपल्या बाईकने गावाकडे, कळमन्याकडे निघाले. यावेळी त्यांच्या खिशात साडे 15 हजार रूपये होते. जाता जाता संध्याकाळचे साडे पाच वाजले होते. तशी ही वेळ काही धोक्याची नसते. श्यामराव वणीहून गावाकडे निघाले. चारगाव रोडवर लागले. पुढे वागदरा रोडवर दोन मोपेडस्वारांनी त्यांना वाटेत थांबवलं. वणीहून चंद्रपूरला अवैध दारू जात असून ती तपासायची असल्याचं या दोन इसमांनी सांगितलं. ते पोलिस असल्याची त्यांनी ओळख दिली.

फिर्यादीला यात काहीच धोका वाटला नाही. त्यांच्याकडे कोणतीच अवैध वस्तू नसल्याने त्यांनी गाडी थांबवून त्यांना तपासणी करू दिली. त्यावेळी श्यामरावांकडे काही रोख रक्कम होती. आता पोलिस म्हटल्यामुळे त्यांना काही विशेष रिस्क वाटली नाही. ती रोकड त्या दोन तोतया पोलिसांनी बळजबरीने हिसकावून घेतली. काही कळायच्या आतचे ते दोघे त्यांची गाडी घेऊन सुसाट वेगाने फरार झाले.

अचानक झालेल्या या घटनेने फिर्यादी श्यामराव हबकलेच. पोलिस असल्याचं सांगणारे ते दोन्ही तोतया असल्याचं त्यांच्या लगेच लक्षात आलं. त्यांनी लगेच वणी पोलिस स्टेशन गाठलं. आपली आपबिती ते सांगू लागले. अलीकडच्या काळात ही घटना तशी नवीनच होती. पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी लगेच यावर अॅक्शन घेतली. प्लानिंग केलं. डी.बी. स्कॉडसह वणी परिसर पिंजून काढला. अखेर यात्रा मैदानात आरोपी सापडले.

अचानक पुढ्यात आलेले पोलिस पाहून आरोपींची पंढरी दणाणली. सुरुवातीला आरोपी टाळाटाळ करू लागले. त्यांनी “तो मी नव्हेच” अशी भूमिका घेतली. पण पोलिसी हिसका दाखवताच आरोपी पोपटासारखेच बोलू लागले. पोलिसांनी लगेच आरोपी शेख आमीर ऊर्फ जर्मन शेख महेबूब (24) रा. एकतानगर, वणी आणि शेख इमरान शेख हुसेन (27) रा. पंचशीलनगर, वणी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लुटलेले 15 हजार 500 रूपये रोख तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी क्रमांक एम. एच. 29 ए. ई. 2930 अंदाजे किंमत 30 हजार रूपये जप्त केले.

यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत अनेकानीं तोतया पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटले. परंतु वणीच्या या घटनेत तोतया पोलिसांना वणी पोलिसांनी केवळ अर्ध्या तासात धुंडाळून काढले. पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

सदर कारवाई पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात पो.उ.नि. अनुप वाकडे, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, नितीन सलामे, संतोष आढाव, दीपक वांड्रसकर यांनी ही यशस्वी कारवाई केली. आरोपींवर भादंवीच्या कलम 170, 392, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.