जनावरे तस्करी प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज बाद

पोलीस कर्मचारी प्रकाश मेश्रामला चिरडल्याचे प्रकरण

0 1,262

विलास ताजने, वणी : चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा नाक्यावर जनावरांची तस्करी करणाऱ्या भरधाव वाहनाने तपासणीसाठी वाहन थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला चिरडल्याची घटना पंधरवड्यापूर्वी घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित आरोपी नरेश निकम घटनेपासून फरार होता. सदर आरोपीने वरोराच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज सादर केला होता. मात्र न्यायालयाने आरोपी निकमचा जामीन अर्ज फेटाळला.

वणी तालुक्यातून जनावरांची तस्करी करणारे दोन टाटा योद्धा कंपनीची वाहने वरोराकडे येत असल्याची गुप्त माहिती २० जानेवारीला रात्री वरोरा पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे खांबाडा नाक्यावर पोलिसांनी तपासणी करीता वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जनावरे वाहून नेणाऱ्या एका वाहनाने  पोलीस कर्मचारी प्रकाश मेश्रामला चिरडल्याने मेश्राम यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इम्तिहाज अहमद फैयाज, मोहम्मद कुरेशी यांना घटनास्थळी अटक केली होती. तर कामठी नागपूर येथून मोहम्मद फहिम शेख आणि आदिल खान यांना वरोरा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून २४ जनावरे ताब्यात घेतली होती.

चौकशी दरम्यान सदर जनावरे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील रासा (घोंसा) येथील श्रीराम गोरक्षण संस्थेतून आणल्याची माहिती मिळाली. गोरक्षण संस्थेतील कामगार पवन उरकुंडे आणि अतुल गौरकार यांचीही पोलिसांनी चौकशी केली. तेंव्हा श्रीराम गोरक्षण संस्था नरेश निकम यांची असल्याचे समजले. घटनेच्या रात्री नरेश निकम यानेच जनावरे दिली. तसेच तस्करी करणाऱ्या वाहना समोर निकम स्वतःचे वाहन चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

परिणामी वरोरा पोलिसांनी नरेश निकमसह सर्व आरोपीवर भा.दं.वि. ३०२  नुसार गुन्हा दाखल केला. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी नरेश निकम याने वरोराच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.व्ही. सेदानी यांच्या समोर १ फेब्रुवारीला जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे न्यायालयाने ऐकून  घेतल्यानंतर नरेश निकमचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. शासनाच्या वतीने ऍड. जी. ए. उराडे यांनी बाजू मांडली.

mirchi
Comments
Loading...