विनंती वगळून अन्य शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू

दिवाळीच्या सुटीपर्यंत केलं जाणार कार्यमुक्त

0

रवी ढुमणे, वणी: आंतरजिल्हा बदली शेवटच्या टप्प्यात असताना आता जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा धडाका सुरू होणार आहे. अप्पर सचिवांनी काढलेल्या आदेशानुसार राज्यभरातील शिक्षकांची ऑनलाईन माहिती भरण्यास सुरुवात झाली आहे. संवर्ग 1 ते 3 या वर्गातील शिक्षकांच्या बदल्या 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून दिवाळी सुट्टीत त्यांना कार्यमुक्त करून नव्या शाळेत हजर व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान संवर्ग 4 मध्ये मोडणार्या आणि संख्येने जास्त असणाऱ्या विनंती बदल्या मात्र पुढील शैक्षणिक वर्षात मे महिन्यापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

27 फेब्रुवारी 2017 च्या अध्यादेशानुसार फक्त शिक्षकांसाठी स्वतंत्र बदली धोरण राबवले जात आहे. या धोरणानुसारच आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑनलाईन माहिती भरून समुपदेशनाने करावयाच्या आहेत. सुगम व दुर्गम अशी स्थाननिश्चिती करून त्याप्रमाणेच या बदल्या करावयाच्या होत्या; पण प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शिक्षक संघटना न्यायालयात गेल्याने ही प्रक्रिया लांबत गेली. शासनालाही वारंवार शुद्धिपत्रके काढून यात सुधारणा कराव्या लागल्या. ऑनलाईन माहिती भरून घेण्यासाठीच्या वेबपोर्टल आणि सर्व्हरच्या समस्येमुळे यात तांत्रिक घोळही आडवा आला. तरी देखील शासनाने बदल्यांवर ठाम राहत ही प्रक्रिया सुरू केली आहे.

त्यानुसार 21 सप्टेंबर रोजी अव्वर सचिवांनी काढलेल्या अध्यादेशानुसार संवर्ग 1 ते 3 ची बदली प्रक्रिया तातडीने सुरू करून ती 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना दिल्या आहेत. या संवर्गाची ऑनलाईन माहिती भरण्यासाठी वेबपोर्टलही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

संवर्ग 3 मध्ये दुर्गम भागात तीन वर्षे सेवा केलेल्यांचा समावेश असून त्यांना आता सुगममध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाल्याने दुर्गम शिक्षक संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 1 ते 3 या संवर्गातील सुमारे 600 शिक्षकांच्या बदल्या 30 सप्टेंबरपर्यंत होत असून त्यांना दिवाळी सुट्टीच्या काळात दिलेल्याशाळेत हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

 

दरम्यान, संवर्ग 4 मधील शिक्षकांच्या बदल्या मात्र पुढील शैक्षणिक सत्रापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संवर्गाच्या बदल्या होणाऱ्या शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्यातर शैक्षणिक सत्र विस्कटण्याची शक्यता असल्याने या शिक्षकांची बदली प्रक्रिया आता स्थगितच करण्यात आली आहे.

या संवर्गात 10 वर्षे सुगममध्ये नोकरी केलेले हे शिक्षक बदलीस पात्र होते. पण आता त्यांना आणखी सहा महिन्यांचा दिलासा मिळाला असून मे महिन्यानंतर त्यांच्या बदल्या होणार आहेत. मात्र अद्याप यवतमाळ जिल्हा परिषदेने धोरण स्पष्ट केले नसले तरी येत्या दोन दिवसात बदल्यांच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.