पीएसआयची पत्रकाराला मारहाण

खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले

0 1,366
बहुगुणी डेस्क, यवतमाळ : झरी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन ठाण्यातील गलिच्छ कारभारामुळे जिल्ह्यातील पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चारचाकी व पायदळ जनावर तस्करीत पाटण पोलीस स्टेशन दुसऱ्या क्रमांकावर आहे. गाय, बैल, म्हैस तसेच गुटखा, गांजा, अवैध दारू तस्करीसह मटका, जुगार राजरोसपणे सुरू आहे. याबाबत वृत्त प्रकाशित करणाऱ्या पत्रकारावर खंडणीचा खोटा गुन्हा नोंदवून पीएसआयने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तालुका तसेच जिल्हा पत्रकार संघटनेकडून निषेध नोंदविण्यात आला आहे..

पाटण पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हायप्रोफाईल जुगार अड्डा सुरू होता. तिथे पोलीस अधीक्षकांच्या पथकाने धाड घालून ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. अधिकाऱ्याची प्रेमलीला तसेच छेडखानी प्रकरणासंदर्भात सुशील ओझा यांनी बातम्या प्रकाशित करून महिला असुरक्षित असल्याचे वास्तव मांडले. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाटण पोलीस स्टेशनचा कारभार कसा सुरू आहे, हे लक्षात आले.

दरम्यान, यामुळे चिडलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांनी संगनमत व षडयंत्र रचून ओझा यांना खंडणीच्या गुन्ह्यात अडकविले. ज्या व्यक्तीशी संबंध नाही तसेच ओळखही नाही, अशा व्यक्तीमार्फत तक्रार दाखल करून घेत खंडणीचा गुन्हा दाखल केला. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पीएसआय सुरेश कनाके हे अमोल अनेरवार, नरेश गोडे, सपना पंधरे यांना सोबत घेऊन ओझा यांच्या घरी आले व त्यांना अटक करून पाटण पोलीस ठाण्यात आणले.

तेथून झरी येथे वैद्यकीय तपासणीकरिता नेले असता डॉक्टरांना येण्यास उशीर लागल्याने पीएसआय सुरेश कनाके यांनी ओझा यांना आपला मोबाइल काढून बातमी दाखवली व तूच ही बातमी छापली ना, असे म्हणून छातीवर बुक्यांनी मारहाण केली. .

त्यावेळेस वरील पोलीस कर्मचारी व बाहेरील चार व्यक्ती हजर होते. त्यांच्या समोर ही मारहाण केली. यामुळे त्यांचा रक्तदाब व शुगर वाढली. त्यांची प्रकृती खूप गंभीर झाली व त्यांना पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र याठिकाणीही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. .

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सात वर्षांखालील कारावास होणाऱ्या कोणत्याही गुन्ह्यात पोलिसांना अटक करण्याचा अधिकार नाही, तरी देखील पोलिसांनी पदाचा दुरुपयोग करून ओझा यांना अटक केली, असे कायद्यातील जाणकार सांगत आहे. पोलिसांना सूचना पत्र देऊन सोडण्याचे अधिकार होते; परंतु पाटणच्या अधिकाऱ्यांचे कारनामे उजागर केल्याने त्याचा वचपा म्हणून ओझा यांना अटक करून मारहाण करण्यात आली.

यामुळे जिल्ह्यातील पत्रकार संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोन्ही अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून त्यांची हकालपट्टी करण्याकरिता जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व सांघटना सरसावल्या असून, दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून चालू घडामोडी व सत्यता छापणे हे कर्तव्य असते. परंतु अशा पोलीस अधिकाऱ्यांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे. पीएसआय सुरेश कनाके यांच्या मारहाणीने ओझा यांची प्रकृती गंभीर झाली असून, अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे..

mirchi
Comments
Loading...