साहित्यिकाची संवेदनशीलता, 10 शेतक-यांना घेतले दत्तक

साहित्य संमेलनाच्या वादात संवेदनशीलतेचे दर्शन

0 666

बहुगुणी डेस्क, वणी: यवतमाळ येथील साहित्य संमेलनाचा वाद आता चांगलाच वाढला आहे. नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण आयोजकांनी मागे घेतल्यानंतर आता अऩेक सहभागी मान्यवरांनी साहित्य संमेलनात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता साहित्यिक भूमिका घेत नाही असा आरोप होत असताना ज्येष्ठ कलावंत आणि साहित्यिक डॉ. दिलिप अलोणे यांनी 10 शेतक-यांना दत्तक घेण्याचे जाहीर केले आहे.

असं म्हणतात की साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यिकांनी समाजाचा आरसा लोकांसमोर आणणे गरजेचे आहे. मात्र अऩेकदा साहित्यिकांना याचा विसर पडतो. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असून दुसरीकडे साहित्य संमेलनाच्या नावाखाली साहित्यिकांचे मानधन आणि कार्यक्रमासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो.

शेतक-याप्रती साहित्यिकांनी जागृत राहून शेतक-यांविषयी भूमिका घ्यावी अशी मागणी चंद्रपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात करण्यात आली होती. ज्या ठिकाणी साहित्य संमेलन असेल त्या जिल्ह्यातील काही गरजू शेतक-यांना योग्य ती मदत करावी अशी मागणी या संमेलनात साहित्यिकांकडून करण्यात आली होती. मात्र पुढे ही मागणी हवेतच विरली.

कलावंत व साहित्यिक डॉ. दिलिप अलोणे यांनी एक संवेदनशील साहित्यिक म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील झरी येथील 10 अल्पभूधारक शेतक-यांना दत्तक घेण्याचे जाहीर केले आहे. यात त्या शेतक-यांना वर्षाकाठी बि-बियाणे, खते, अवजारे इत्यादी गोष्टींसाठी जो खर्च येईल तो खर्च स्वतः डॉ. अलोणे उचलणार आहे.

वणी बहुगुणीशी बोलताना डॉ. अलोणे म्हणाले की साहित्यिकांनी केवळ त्यांच्या साहित्यातून समस्या मांडू नये तर त्याला कृतीचीही जोड द्यावी. साहित्यिक केवळ समस्या मांडून एखाद्या प्रश्नावर फुंकर घालण्याचं काम करतात. मात्र केवळ फुंकर घालणे इतकीच साहित्यिकाची जबाबदारी नाही तर तो प्रश्न सोडवण्यासाठी कृतीची ही जोड द्यावी.

त्यांच्या या कृतीचे समाजातून स्वागत होत असून इतर साहित्यिकांनीही अशा प्रकारे भूमिका घ्यावी अशी आशा व्यक्त केली जात आहे. प्रा. डॉ. दिलिप अलोणे हे महाराष्ट्रातील नामवंत नकला कलावंत असून एक साहित्यिकही आहेत. नकला या लोककलेच्या प्रसार आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. सोबतच ते एक प्रगतीशील शेतकरी आहे. कमी जागेत विक्रमी पीक घेण्याची किमया त्यांनी केली आहे.

mirchi
Comments
Loading...