रेती तस्करांनी केला लाखो रुपयांचा रेती साठा जमा

पावसाळा लागताच नदीजवळील शेतात रेतीचे ढिगारे

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात रेती तस्करीच्या प्रकरणात प्रचंड वाढ झाली आहे. रेती तस्कर कुणालाही न जुमानता दिवसरात्र खुलेआम तस्करी करीत आहे. तालुक्यातील हिरापूर एकच रेतीघाट हर्रास झाला असून दुर्भा, पैनगंगा व खुनी नदीच्या पात्रातून सर्रास रेती तस्करी सुरू आहे. पैगंगाव व खुनी नदीच्या पाणी कमी असलेल्या पात्रातून रेती काढून नदी जवळील गावात व शेतात शेकडो ब्रास रेतीचे ढिगारे लावून लाखो रुपयांचा साठा जमा करून ठेवण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त येडसी, मुंजाला, कोसारा, परसोडा, धानोरा, व इतर नदी पात्र व नाल्यातील रेती चोरी करून ३ हजार ते ४ हजार रुपये प्रमाणे विक्री करून लाखो रुपये कमवीत आहे. तालुक्यात ४० ते ५० रेती तस्कर असून बहुतांश तस्करांची पार्श्वभूमी राजकीय आहे. तर उर्वरित राजकीयांचेच हितसंबंधीत असल्याने महसूल विभागाला कर्यवाहीस अडचण निर्माण होत आहे. दिवसा पांढरे कपडे घालून जनतेसमोर मोठा समाजसेवक दाखवणे व दुसरीकडे रात्रंदिवस चोरी करणे असा उपक्रम अनेक करीत आहे. तर चोराला साथ देणारा चोरच म्हणून संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे.

काही वर्षांपूर्वी काही रेती तस्कराची एक वेळची जेवणाची व्यवस्था नव्हती. परन्तु रेती चोरी करून तस्करीत लाखो रुपये कमवून बंगला, चारचाकी व ट्रॅक्टर , शेती विकत घेऊन फिरत असल्याचे पहायला मिळत आहे. अशा रेती तस्करांवर कार्यवाही कोण करणार असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे रेती तस्करावर फास आवळण्याचा प्रयत्न महसूल विभागाने केला तर राजकीय दबाव येत असल्याचे अनेक प्रकार पहायला मिळत आहे.

रेती तस्करीत हिरापूर गावाच्या पाहिले शेतात व हिरापूर गावातील इलेक्टिक डीपी जवळ ४० ते ५० ब्रास रेती साठा केल्याचे दिसत आहे .तरी ही रेती जप्त करणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.राजकीय लोकांनी जनसेवा सोडून रेती चोरी व ठेकेदारिचा मोठा ठेका तालुक्यात घेतल्याचे दिसत आहे. ज्यामुळे जनतेनी अश्या लोकांना निवडून फक्त स्वतःच्या कमाई करीता दिले की जनतेच्या कामाकरिता हे एक कोडेच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.