ट्रॅक्टर मालकाला १ लाख १५ हजारांचा दंड

विनारॉयल्टी रेतीची अवैधरित्या वाहतूक

0
सुशील ओझा, झरी: विनारॉयल्टी रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडण्यात आले. यावेळी ट्रॅक्टरमालकाला १ लाख १५ हजारांचा दंड करण्यात आला. या कारवाईमुळे रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहे.
रेतीघाटावरील बंदी उठताच रेतीचोरी सुरू झाली आहे. मुंजाळा, मांगली, हिरापूर, कोसारा मार्गावरील नाला, तेजापूर, पिंपरड आदी नदी-नाल्यातून दिवसरात्र खुलेआम रेतीची चोरी केली जात आहे. मुकुटबन येथे नवीन एका खाजगी कंपनीमध्ये हिवरदरा तसेच मुकुटबन परिसरातील रेती चोरी करून विनारॉयल्टी ५ हजार रुपये ब्रासप्रमाणे विक्री केली जात आहे.
१९ मे रोजी रात्री १ वाजता हर्रास न झालेल्या हिरापूर घाटातून १ ब्रास रेती भरून मांगली येथील नरेंद्र राखुंडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर जात होता. यावेळी नायब तहसीलदार खिरेकर व कर्मचाऱ्यानी ट्रॅक्टर अडवून चौकशी केली. यावेळी सदर रेती चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले. रात्री ३ वाजता तहसील कार्यालयात ट्रॅक्टरमालकाला १ लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. रेतीचोरी पकडण्याकरिता नायब तहसीलदारांनी तेलंगणातील अनंतपूर मजरा, सांगडी गावातील घाटांवर गस्त घालून ही कारवाई केली.
अवैध रेती तस्करीबाबत ‘वणी बहुगुणी’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले. त्या पार्श्वभूमीवर नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर रात्री गस्त घालून अनेक ट्रॅक्टरचालक व मालकावर कारवाई करीत आहे. मात्र काही महसुलातीलच कर्मचारी त्यांना ‘टिप्स’देत असल्याने शासनाचे नुकसान होत आहे. काही रेती तस्कर महसूलच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना न जुमानता बदलीची धमकी देत असल्याची माहिती आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.