शहीद राजेंद्र कुळमेथे यांना वणीत भावपूर्ण आदरांजली

राजेंद्र कुळमेथे यांच्या परिवाराला दीड लाखांची मदत

0 1,574

विवेक तोटेवार, वणी: आरोपीच्या हल्ल्यात जीव गमवावा लागलेले मारेगाव येथील पोलीस जमादार शहीद राजेंद्र कुळमेथे यांना रविवारी वणीत आदरांजली वाहण्यात आली. शीवतिर्थावर आयोजित या कार्यक्रमात वणीतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे होते.

दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम राजेंद्र कुळमेथे यांच्या प्रतिमेसमोर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिट मौन राहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गीत घोष यांनी केले. प्रास्ताविकेत त्यांनी पोलिसांवरील हल्लाबाबत चिंता व्यक्त केली.

मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी असून पोलिसांवर वेळोवेळी होणारे हल्ले ही एक शोकांतिका आहे. अशा कठिण प्रसंगी आपण सर्वांनी त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत राहाणे गरजेचे असून त्यांना न्याय मिळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे ते बोलले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की पोलिसांना आदरांजली देण्यासाठी एका महिन्यात दोनदा वणीकरांना गोळा व्हाव लागत आहे ही एक दुर्दैवी बाब आहे. कुळमेथे यांच्या मुलांना शासकीय नोकरीत समावेश करण्यात यावा, तसेच जोपर्यंत मुलाचा शासकीय नोकरीत समावेश होत नाही तोपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण वेतन मिळावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी संजय पिंपळशेंडे, राजाभाऊ पाथ्रटकर, प्रवीण खानझोडे, मोहन हरडे, संगीता खटोड, राकेश खुराणा, अजय धोबे, मंगल तेलंग, रुद्रा कुचणकर, गेडाम सर, पोलीस उपनिरिक्षक काकडे, कन्नाके इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.

राजेंद्र कुळमेथे यांच्या परिवाराला दीड लाखांची मदत
आज सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी वणीत येऊन कुळमेथे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दिड लाखांच्या तात्काळ मदतीचा चेक त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केला. यावेळी त्यांनी प्रशासन राजेंद्र कुळमेथे यांच्या मुलाला नोकरी देण्यासाठी सकारात्मक असून जर वेळ पडल्यास जिल्ह्याबाहेर जरी नोकरी मिळाली तर ती करण्याची तयारी ठेवावी असे बोलत लवकरात लवकर कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्याचे संकेत दिले.

मुंबईत जेव्हा एक पोलिसाला वीरमरण आले होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना लगेच शासकीय नोकरीत सामावेश करण्याचा आदेश दिला होता. मात्र या घटनेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेट घेऊन अशी घोषणा का केली नाही असा सवाल स्वप्निल धुर्वे यांनी उपस्थित केला.

या कार्यक्रमाचे आयोजन स्वप्निल धुर्वे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर कोडापे, रमेश कुडमेथे, संतोष चांदेकर, मायाताई मरसकोल्हे, रानु तुमराम, सुरेश गेडाम, कोवे सर, उईके सर, विलास मसराम, कपिल कोटनाके, शंकर किन्नाके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्नेने वणीकरांनी हजेरी लावली होती.

mirchi
Comments
Loading...