शिवसेनेचे आंदोलन चिघळले, रास्ता रोको व टायरची जाळपोळ

प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे आंदोलन तीव्र

0

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील कोळसा खाणीत स्थानिकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी शिवसेनेतर्फे बेमुदत उपोषणाला सुरूवात झाली. आज उपोषणाच्या दुस-या दिवशी हे आंदोलन चिघळले. दुपारी अचानक शिवसैनिकांनी आक्रमक रूप धारण करत रास्ता रोको केला. तसेच टायरची जाळपोळ केली. यामुळे दोन्ही दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या.

वणी तालुक्यातील निलजई, जुनाड, कोलारपिंपरी या कोळसा खाणीत स्थानिकांच्या शेतजमिनी गेल्या आहेत. या कोळसा खाणीत प्रकल्पग्रस्तांना डावलून खासगी कंपनीमार्फत कामे केली जात आहे. प्रकल्पग्रस्तांना व स्थानिकांना कंपनीमध्येे नोतकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. अखेर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात कालपासून उपोषणाला बसले आहेत. याबाबात काल उपविभागीय अधिका-यांना निवेदनही देण्यात आले होते.

आज दुपारी शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आलेे. तसेच तात्काळ उपोषणस्थळी बोलणी करण्यासाठी प्रतिनिधींना पाठवावे अशी मागणी त्यांनी केली. मात्र अर्धा तास प्रशासनातर्फे कोणताही प्रतिनिधी पाठवण्यात आला नाही. अखेर उपोषणकर्ते शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी उपोषणस्थळी तहसिल कार्यालयासमोरच आधी चक्का जाम केला व त्यानंतर टायर जाळले. आंदोलन उग्र होताच परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावर ठिकठिकाणी टायर जाळल्याने रस्ता बंद झाला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही दिशेची वाहतूक खोळंबली.

वणी बहुगुणीशी बोलताना विश्वास नांदेकर म्हणाले की…

प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून न घेणे हा विषय अत्यंत गंभीर आहे. आम्ही शांतपणे यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यापुढे कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहणार. 

या आंदोलनात सतीश वऱ्हाटे, चंद्रकांत घुगुल, संतोष माहूरे, अभय सोमलकर, राजु तुराणकर, शरद ठाकरे, डिमणताई टोंगे, योगीता मोहोड, प्रणीता घुगुल, सविता आवरी, मधुकर झोडे, गुलाब आवारी, मते पाटील, वनिता काळे, संजय आवारी, दीपक कोकास, अजय नागपूरे, प्रशांत बल्की, तेजराज बोढे, महेश चौधरी, सचिन मते, राजु वाघमारे, मोरेश्वर पोतराजे, मंगल भोंगले यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले आहेत.

वृत्त लिहेपर्यंत किती किती आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले याची माहिती अद्याप समोर आली नाही.

लिंकवर क्लिक करून पाहा बातमीचा व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.