संतप्त गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप

तुकड्या 7 तर शिक्षक 1, तेजापूरच्या शाळेसोबत 'नाइंसाफी'....

0

विवेक तोटेवार, वणी: तेजापूर येथील शाळेच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकल्याची घटना मंगळवारी घडली. तेजापूर येथील जिल्हा परिषदेचा शाळेत एक ते सात पर्यंत तुकड्या आहेत. मात्र या सात वर्गासाठी केेवळ एकच शिक्षक आहेत. तेजापूरवासियांची शाळेवर शिक्षकांची मागणी आहे. मात्र त्यांंच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. अखेर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकले.

तेजापूर हे वणी तालुक्यातील शेवटचे गाव. या गावात इयत्ता एक ते सातवी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. गेल्या वर्षी या शाळेत एकूण सात शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवायचे. या वर्षी सहा शिक्षकांच्या बदल्या झाल्याने शाळेवर एकच शिक्षक उरले होते. त्यामुळे 153 विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी एकाच शिक्षकावर आली.

एक शिक्षकी शाळा असल्याने इथे दोन शिक्षकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली. ज्या शाळेत शिक्षकांची संख्या पुरेशी असते किंवा जिथे अतिरिक्त शिक्षक असतात अशा शििक्षकांची दुसऱ्या शाळेवर प्रतिनियुक्ती केली जाते. मात्र प्रतिनियुक्ती ही तात्पुरती सोय आहे. ते शिक्षक कधीही शाळेतून दुसऱ्या जागी जाऊ शकतात. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले.

शाळेतून अनेक पालक आपल्या पाल्यांचे शाळा सोडल्याचे दाखले काढीत असल्याची माहिती आहे. जर या ठिकाणी शिक्षक भरती केली गेली नाही तर चिमुकल्यांना नाहक शिक्षणासाठी पायपीट करावी लागणार आहे.

ऑनलाईन बदलीचा फटका  ? 

यावर्षी शिक्षकांची ऑनलाईन बदली करण्यात आली. तेजापूर हे गाव वणी तालुकाचे शेवटचे टोक आहेे. तसेच वणीपासून या गावाचे अंतर देखील अधिक आहे. त्यामुळे शिक्षकांची या गावातील शाळेला पसंती नसते. यावर्षी इथल्या सहा शिक्षकांच्या बदल्या झाल्या. तसेच ऑनलाईन बदली प्रक्रियेतही शिक्षकांनी इथल्या शाळेची निवड न केल्याने या शाळेला फटका बसल्याचे कळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.