वाहतूक पोलिसाची तरुणाला मारहाण, तरुण जखमी

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, अद्याप गुन्हा दाखल नाही

0 5,138

विवेक तोटेवार, वणी: काही दिवसांपूर्वी एका वाहतूक पोलिसांकडून एक महिला व तिच्या मुलांना मारहाण केल्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोवर पुन्हा एका तरुणाला वाहतूक पोलिसाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असली तरी आरोपींवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

तक्रारीनुसार, आशिष ठक्कर ( 24) हा दुर्गापूर, चंद्रपूर येथील रहिवाशी आहे. हा वणीजवळील गणेशपूर येथील भगत बिल्डर हिमालय ऍक्वामध्ये काम करतो. रविवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान अशिष काम संपवून रोशन नामक त्याच्या मित्रासोबत चंद्रपूरकडे जाण्यासाठी निघाला. वाटेत पॉव्हर हाऊस जवळ वाहतूक पोलीस नीलेश कुंभेकर यांनी त्याला अडवले. त्याला वाहतूक परवाना मागितला. मात्र परवाना नसल्याने त्याला दोनशे रुपयांचे चालान फाडण्याचे सांगितले. मात्र परंतु जवळ पैसे नसल्याने आशिषने पैसे आणून देतो असे सांगितले.

दरम्यान जवळ असलेल्या एका व्यक्तीने या दोघांचा मोबाईल फोटो काढला. नीलेश कुंभेकर यांना वाटले की आशिषनेच फोटो काढला व त्यांनी आशिषचा मोबाईल हिसकावून घेतला व त्याला वाहतूक पोलीस उपशाखेत आणले. त्याठिकाणी पोलिसांनी आशिषला मारहाण केली. त्यावेळी सर्व वाहतूक विभागातील कर्मचारी उपशाखेतच हजर होते. नीलेश यांनी आशिषला लाथ मारली असता त्याचे डोके भिंतीवर आदळले. डोक्यावर मोठा आघात झाल्याने त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.

याबाबत आशिषने लगेच याबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. परंतु तिथे हजर असलेल्या पोलिसांनी तू दारू तस्करी करतो. त्यात तुला अडकवेल असे सांगून घाबरवण्यास सुरूवात केली असा आरोपही पीडित तरुणाने केला आहे. मात्र तरुणाने हार मानली नाही. तो तक्रार देण्याच्या निर्णयावर ठाम होता. रक्तस्त्राव अधिक होत असल्याने त्याने स्वतः ग्रामीण रुग्णालयात जाऊन औषधोपचार केला व संध्याकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान पुन्हा पोलीस स्टेशन गाठले. यावेळी आशिषला तक्रार न देण्यासाठी पैशाचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप तरुणाने करत त्याला न जुमानता त्याने पोलिसात तक्रार दिली. मात्र अद्यापही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

वाहतूक सुधारक की “ठग्स ऑफ ब्लॅक डायमंड सिटी’?

पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा पूर्ण प्रयत्न होत आहे. वाहतूक पोलिसांनी मारहाण झाल्याऐवजी गाडीवरून पडल्याने मार लागला असे लिहून घेतल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. तसेच दोनशे रुपयांचे चालन बनवत नाही तू 100 रुपये देऊन प्रकरण मिटव असं करत 100 रुपयांची मागणी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वाहतूक विभाग नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. काही दिवसांआधीच एका वाहतूक पोलीस उप निरीक्षकाने एका कुटुंबातील महिला व तिचा मुलगा व मुलीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचीही तक्रार नोंदवण्यात आली होती मात्र आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्या अगोदर कोरपना येथील एका शिक्षकाच्या खिशातून पाच हजार रुपये काढण्याचा प्रताप केल्याचा आरोप याच पोलीस उपनिरीक्षकावर करण्यात आला होता.

असे प्रकार दर पंधरा दिवसांनी उघडकीस येत आहे. मात्र हे प्रकार पोलीस संगनमतानेच दाबण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्यातच ओव्हरलोड वाहतुकीला मूक संमती देऊन हात ओले करण्याचा आरोप या विभागावर होतोय. ओव्हरलोड वाहतुकदारांना रान मोकळे ठेऊन दुचाकीस्वारांवर कारवाई करून आपला तोरा मिरवत असल्याचे दिसून येत आहे. ज्याप्रमाणे वाटमार एखाद्या जागेचा आडोसा घेऊन लुटतात. त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस एखादया जागेचा आडोसा घेऊन लपून बसतात व सर्वसामान्यांवर कार्यवाही करतात असा आरोप वणीकर नेहमीच करत आहेे. त्यामुळे हे पोलीस सर्वसामान्यांचे रक्षक आहे की भक्षक आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याआधी वाहतूक पोलिसांवर बाचाबाचीतून हल्ला झालेला आहे. अशा वेळी आरोपींवर त्वरीत कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र जेव्हा पोलिसांकडून सर्वसामान्यांना मारहाण करून कायद्याचा भंग केला जातो तेव्हा मात्र असे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताना हा विभाग दिसतोय. त्यामुळे आता अशा मुजोर पोलिसांवर वरिष्ठ कार्यवाही करून विभागातील प्रतिमा सुधरवेल का असा प्रश्न विचारला जातोय.

mirchi
Comments
Loading...