साहित्य संमेलन सर्वसामान्यांचे की भाजपचे ?

0

वणी: नुकतेच वणीत विदर्भ साहित्य संमेलन पार पडले. राज्यभरातून साहित्यिकांचा मेळा वणीमध्ये जमला होता. मात्र या संमेलनात जाणूनबुजून विरोधी पक्षाच्या लोकांना वगळण्यात आल्याचा आरोप आयोजकांवर होत आहे. केवळ भाजपच्या लोकांना व्यासपिठावर स्थान देण्यात आले. त्यामुळे हे संमेलन सर्वसामान्यांचे होते की केवळ भाजपचे होते का असा सवाल उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार आणि शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी देखील या संमेलनापासून दूर राहणे पसंत केले. यासोबतच निमंत्रण नसल्याने विरोधी पक्षात असलेले अनेक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रहारचे अखिल सातोकर वणी बहुगुणीशी बोलताना म्हणाले की वणीमध्ये इतक्या वर्षांनी साहित्य संमेलन होत असल्याने आम्हाला त्याचा आनंद होता. मात्र आयोजकांना केवळ भाजपचे आणि एका समाजाचे साहित्य संमेलन करायचे असल्याने आम्हाला यापासून दूर ठेवण्यात आले. आम्हाला स्टेज नको होता. आम्ही स्वयंसेवक म्हणून सतरंजी उचलण्याचे काम देखील आवडीने केले असते. मात्र आम्हाला कोणत्याही प्रकारचे आमंत्रण नव्हते. शिवाय आम्हाला संमेलनाच्या कोणत्याही प्रक्रियेत सहभागी केले नाही. याचा आम्ही निषेध करतो.

याबाबत शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्याशी ते मुंबईत असल्याने संपर्क होऊ शकला नाही. मात्र शिवसेनेचे राजू तुराणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करावे अशी सूचना पत्राद्वारे आयोजकांना केली होती. मात्र त्यांच्या सूचनेकडे आयोजकांनी दुर्लक्ष केले. विश्वासभाऊ यांना विशेष निमंत्रितांचा पास नसल्याने त्यांनी या संमेलनाकडे दुर्लक्ष केले.

श्री गुरुदेवसेनेचे संयोजक दिलीप भोयर म्हणाले की विदर्भ हा तीन महापुरुषांच्या नावामुळे ओळखला जातो. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि पंजाबराव देशमुख यांच्या नावाने विदर्भात विद्यापीठ देखील आहे. या महापुरुषांच्या कार्याने आणि साहित्याने समाज घडवला. मात्र या महापुरुषांच्या विचारांवर आणि साहित्यावर इथे कोणताही परिसंवाद झालेला नाही. केवळ विशिष्ट लोकांच्या साहित्यावर प्रकाश टाकण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने करण्यात आलं. हे संमेलन संपूर्ण विदर्भाच्या नावाखाली एका विशिष्ट लोकांसाठी विशिष्ट लोकांनी आयोजित केलेलं साहित्य संमेलन होतं.

तर कॉम्रेड दिलिप परचाके म्हणाले की हे साहित्य संमेलन म्हणजे बीजेपीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता. यात भाजपच्या पुढा-यांना आणि मंत्र्यांना बोलावण्यात आलं आणि या निमित्ताने आयोजकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यात भाजपचे कार्यक्रम पार पाडले. शिवाय मंत्री आल्यानंतर या भागातील शेतक-यांच्या प्रश्नांवर बोलणे अपेक्षीत होते. मात्र एकाही शेतक-यांच्या प्रश्नांवर बोलणे मंत्र्याला गरजेचे वाटले नाही. मंत्र्यांना बोलावून आयोजकांनी यानिमित्ताने 2019 ची पूर्व तयारी केली आहे.

आयोजकांना पडला वणींच्या कविंचा विसर
वणीतील तीन महत्त्वाचे कवी म्हणजे गौतम सुत्रावे, कृष्णाजी लाडसे आणि लक्ष्मीकांत घुमे. दिवंगत कवी कृष्णाजी लाडसे यांची वणीची महती सांगणारी ‘वणी बहुगुणी’ ही सुप्रसिद्ध कविता माहिती नसलेला व्यक्ती शोधून सापडणार नाही. ‘वणी बहुगुणी रस्ते चौकोनी, नवरे नारदमुनी बायका पद्मिनी, ज्याचं नाही कुणी त्यानं यावं वणी’ या कवितेच्या ओळीने वणी ओळखली जाते. या कवितेची अनेक कविने भ्रष्ट नक्कल केली असून प्रसिद्ध मिळवली आहे. तसंच लक्ष्मीकांत घुमे यांच्या भाकरीच्या शोधात या दीर्घकाव्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या दीर्घकाव्याला पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र या तिन्ही कवींकडे आयोजकांनी दुर्लक्ष केले. संमेलनस्थळापासून दूर जिथे कुणी फिरकलेही नाही अशा कविकट्ट्याला लक्ष्मीकांत घुमे यांचे नाव देण्यात आले होते. हा वणीतील कविंचा अवमान असल्याची प्रतिक्रिया वणीतील साहित्यप्रेमींमधून उमटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.