वणीतील मटका व्यावसाईकांना नेमका कुणाचा आशीर्वाद ?

राजरोसपणे मटका सुरू असताना सर्वच कसे झोपे गेलेले ?

0

रवि ढुमणे, वणी: शहरात सध्या मटका व्यवसायाची जोरदार रेलचेल सुरू झाली आहे. बाजारपेठ तर थेट तहसिलदार व पोलीस ठाण्याच्या अगदी जवळच मटका व्यावसाईकांनी आपले बस्तान मांडले आहे. मात्र या अवैध व्यवसायाला नेमके पाठबळ कुणाचे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कुणा कुणाचा या मटका व्यावसायीकांवर वरदहस्त आहे ज्यामुळे मटका व्यावसायिक राजरोसपणे मटका सुरू ठेवत आहेत. तसंच पोलीस प्रशासनही अगदी समोरच मटका सुरु असतानाही त्यांना अभय देत आहे.

वणीमध्ये कुणालाही विचारा की मटका कुठे चालतो ? असं विचारल्यावर कुणीही त्याचा पत्ता सांगेल, हे सर्व राजरोसपणे सुरू असताना याचा पत्ता पोलिसांना नाही याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. त्यामुळे या मटका व्यावसायिकांवर कुणाचा हात आहे हा प्रश्न पडतो. वणीत मटक्याच्या व्यवसाय फार मोठ्या तेजीत आला आहे. मुख्य बाजारपेठ, दिपक चैपाटी, शाम टॉकीज, तहसिलदाराच्या बंगल्याजवळील नगर पालिकेचे गाळे आणि अगदी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या सिंदी कॉलनी जवळ मटका व्यावसाईकांनी बिनधास्त बस्तान मांडले आहे. या व्यवसायामुळे तरुण, शाळकरी मुळे तसेच वर्षभर काबाडकश्ट करून शेतात पिकविलेला शेतमाल विकणारे लोक बळी पडताना दिसत आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या या खेळात अनेकांची कुटुंब डबघाईस आले आहे. मात्र या अवैध व्यावसाईकांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

डीबी पथक काय करत आहे ?
पोलीस ठाण्यात डीबी पथक आहे. हे डीबी पथक केवळ खबर्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर चंद्रपूरात जाणा-या दारूवर कारवाई करताना दिसत आहे. छोट्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांचेविरूध्द कारवाई करणे आणि प्रसिध्दी मिळविणे इतकेच काम डीबी पथकाला असल्याचे दिसत आहे. मात्र दारूची मोठी तस्करी करणा-या बड्या माशांवर कारवाई करायला डीबी पथकाचे हात अद्याप धजावले नाही. तसाच प्रकार मटक्यात सुध्दा आहे. मटकापट्टी फाडणा-या कामगारांवर कारवाई करून मटका जुगारावर कारवाई केल्याचे दाखविण्यात येते. मात्र प्रत्यक्षात एकाही मटका किंगवर अद्याप कारवाई झालीली नाही. याला कारणही तसेच आहे.

पथकातील हुकूमी एक्के या मटका व्यावसायिकांच्या दावणीला बांधल्या गेले असल्यानेच बड्या माशांवर कारवाई होताना दिसत नाही. असा आरोप होतो. दिवसभर तहसिलदारांचा बंगला, सिंधी कॉलनी, शाम टॉकीज, दिपक टॉकीज, आदी भागात लोकांची झुंबड बघायला मिळते. अगदी ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या मटका व्यवसायाकडे पोलीसही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. सोबतच राजूर येथून मोठ्या प्रमाणात अवैध दारू चंद्रपूरात जाताना दिसत आहे. परंतू त्याकडेही पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.

मटका व्यावसायिकांना राजकीय पाठबळ ?
शहरात राजरोसपणे मटक्यासारखे अवैध धंदे चालत असताना त्यांना बळ कोण देत हा प्रश्न सर्वांना पडतो. मात्र शहरात अवैध व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी मटका व्यावसायिकांनी राजकीय आश्रय घेतला असल्याची चर्चा सध्या शहरात जोरात आहे. एक मटका किंग सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या दिमतीला असल्याचे बोललं जात आहे. इतकेच नव्हे तर त्याला एका समितीचा अध्यक्ष सुध्दा बनविल्याची माहिती आहे.

म्हणजेच या अवैध मटका व्यावसायिकांना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे पाठबळ नक्कीच मिळक असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. अवैध व्यावसायिकांना पाठबळ देत लोकप्रतिनिधी तो मी नव्हेच अशा भूमिकेत असल्याचे दिसत आहे. अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पाउल उचलले तर राजकीय दडपण त्यांच्यावर येतय आणि येथेच अवैध व्यवसायाला खतपाणी मिळतय असं देखील अनेकदा समोर आलं आहे.

(हे पण वाचा: वणी नगर परिषदेच्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी ‘मटका’ किंग)

एकूणच वणी शहरातील अवैध मटका व्यवसाय, कोळसा तस्करीला स्थानिक आमदार खासदारांचे पाठबळ तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणावरील अवैध व्यवसाय बंद होणार की ते आहे तसेच सुरू राहणार हे येत्या काही दिवसात कळेलच.

यातील काही मटका किंग तर सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदार व इतर पदाधिकार्यांसोबत फिरतांना दिसत आहे. यावरून या मटका व्यवसायाला आमदार खासदारांचा आश्रय असल्याचे यावरून दिसायला लागले आहे.

(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400)

Leave A Reply

Your email address will not be published.