वेकोलिने पकडले भंगार चोरून नेणारे ट्रक

तलवारीच्या धाकावर भंगार चोरी, वणीची वाटचाल जंगलराजकडे?

0

विवेक तोटेवार, वणी: तलवारीच्या धाकावर भंगार चोरण्याचा थरारक प्रकार कुंभारखनी खाणीत मंगळवारी रात्री घडला. या प्रकरणात आज वणीत वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांनी दोन भंगार भरलेले ट्रक पकडले. मात्र यात वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही जप्तीची कार्यवाही करताना या व्यवसायामागे असलेला म्होरक्या हा घटनास्थळीच हजर होता. त्यामुळे राजकीय वरदहस्तामुळे अवैध व्यवसायिकांची हिम्मत वाढली आहे का ? असा प्रश्न वणीकर जनता उपस्थित करीत आहे.

कुंभारखनी ही कोळसा खाण बंद आहे. मंगळवारी रात्री 1.30 वाजताच्या सुमारास वेकोलीच्या या बंद पडलेल्या खाणीत 52 ते 55 भंगारचोर घुसण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी वेकोलीचे सुरक्षा रक्षकानीं विरोध केला. त्यावर त्यातील काही जणांनी तलवारीच्या धाकावर पाचही सुरक्षा रक्षकाना धमकावले. ज्यामध्ये एकनाथ चटप, बंडू दुर्योधन, सुरेश हस्ते, उमेश राजूरकर व एक कर्मचारी यांना बंदिस्त केले. त्यानंतर त्या चोरट्यानी वेकोलीतील भंगार कापण्यास सुरवात केली.

भंगार चोरट्यांनी सुमारे 2 तासात अंदाजे 12 लाख रुपयांचे भंगार कापून गाडीत भरले व त्या ठिकाणाहून पळ काढला. दरम्यान वेकोलीच्या सुरक्षा रक्षकांनी वेकोलीच्या बंदूकधारी रक्षकांना ही माहिती दिली. परंतु तोपर्यंत चोरटे माल घेऊन जाण्यात यशस्वी झाले होते.

वेकोलिचे सुरक्षा अधिकारी किरण जॉय यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी रात्रीच त्वरित तक्रार करण्यासाठी वणी पोलीस ठाणे गाठले. परंतु आधी पोलिसांनी किती भंगार चोरी गेले याची माहिती मागितली. त्याबद्दल माहिती लिहून दिल्यानंतर वेकोलीच्या लेटर पॅडवर तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पुन्हा तक्रार देणाऱ्या वेकोली अधिकाऱ्याला चोरी गेलेल्या मालाची किंमत लिहून आणण्यास सांगितले.

हा सर्व उडवाउडवीचा प्रकार होत असतानाच वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी वणीतील पॉव्हर हाऊस जवळील गोकुळ नगर येथील मुसा शकील यांच्या दुकानाजवळ वेकोलिच्या भंगारने भरलेले दोन ट्रॅक पकडले. या वेेेेळी एका वाहनातील भंगार दुसऱ्या वाहनात भरले जात होते. 

वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांनी त्या ट्रकमधील भंगाराची तपासणी केली असता ते वेकोलीचेच असल्याची खात्री पटली. त्याच वेळी त्यांनी वाहन चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी चालक पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यातच ज्या भंगारच्या दुकानात हा सर्व माल खाली होणार होता त्या दुकान चालकाला ड्रायव्हरचे नाव विचारताच सुरक्षा रक्षकांना भंगार दुकानाचे मालक मुसा शकील याने धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. त्यानंतर फोन केल्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने पोलीस आले व ट्रक ताब्यात घेतले.

दरम्यान भंगार चालकाने सदर भंगार हे वेकोलिकडून 2010 ला विकत घेतले असून याची पावती असल्याची सारवासारव केली. मात्र पोलिसांनी कार्यवाही पूर्ण केली. वृत्त लिहेपर्यंत अध्यापही गुन्हा दाखल झाला नव्हता.

चोरट्यांमध्ये संपूर्ण युवा वर्ग असल्याची माहिती वेकोली सुरक्षा अधिकारी किरण रॉय यांनी दिली. त्यातील काही चोरटे तर 18 वर्षापेक्षा ही कमी असल्याची माहिती आहे. या तीनही वाहनांच्या वाहन क्रमांकावर जाणीवपूर्वक चिखल लावून गाडीची ओळख लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

वणीची वाटचाल जंगलराजकडे?
वेकोलि रक्षकांना धमकावून राजरोसपणे कोळसा चोरी करणे ही नित्याचीच बाब झाली आहे. आता बंद खाणीत घुसून तलवारीच्या धारेवर भंगार चोरण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. आता यावर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्व वणीकरांचे लक्ष लागले आहे. भर दिवसा चोरी केलेला वेकोलीचा माल भंगार दुकानात खाली केल्या जात असल्याने आपणास कुणीही काही करणार नसल्याची शाश्वती चोरट्याना असल्याचे यावरून दिसून येत आहे. ही शास्वती यांना कुठून आली ? राजकीय वरदहस्तामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांची हिम्मत वाढली असल्याची चर्चा या प्रकरणामुळे जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.