संतप्त महिलांनी जाळले अवैध दारू विक्रीचे दुकान

अवैध दारूविरोधात महिलांचा एल्गार

0

विवेक तोटेवार, वणी: नायगाव आणि सावर्ला येथील महिलांनी अवैध दारूविक्रीविरोधात एल्गार पुकारला असून संतप्त महिलांनी एक दुकान जाळल्याचीही माहिती मिळत आहे. या महिला एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी त्यांचा मोर्चा वणीजवळच्या टर्निंग पॉइंट इथेही वळवला. महिला संतप्त झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे वृत्त लिहेपर्यंत पोलीस दल टर्निंग पॉइंट इथे दाखल झाले होते.

नायगाव आणि सावर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू होती. पानटपरी, चहाटपरी इथून राजरोसपणे अवैध दारूची विक्री सुरू होती. त्यामुळे परिसराती तरुण, कर्तेधर्ते पुरुष मंडळी व्यसनाच्या आहारी गेली होती. याप्रकरणी स्थानिक महिलांनी वेळोवेळी निवेदन देऊन याविरोधात कार्यवाही करावी अशी मागणी केली. मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. अखेर महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी मंगळवारी सकाळी उग्र रूप धारण केले.

सकाळी 10 च्या सुमारास महिलांनी अवैध दारू विक्रीच्या दुकानावर धाड टाकत ते दुकान बंद केले. तर नायगाव सावर्ला या रस्त्यावरील एक पानटपरी जिथून अवैधरित्या दारूविक्री व्हायची ते दुकान जाळले. या वेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री दुकानातून दारू जप्त केली आहे. काही काळासाठी त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलनही केले. त्यामुळे काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. जाळपोळ केल्यानंतर महिलांनी त्यांचा मोर्चा टर्निंग पॉइंट या रेस्टॉरंटकडे वळवला. या रेस्टॉरंटमधून मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत असल्याचा आरोप या महिलांचा आहे. महिला टर्निंग पॉइंट मध्ये पोहचताच तेथे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दाखल झाले. वृत्त लिहित पर्यंत कोणालाही अटक झाली नसून गुन्हा दाखल झालेला नाही. सदर महिला या बचत गटाच्या असल्याची माहिती आहे.

परिसरातील अवैध धंदे बंद झाल्याचा दावा फोल?

वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी काही दिवसांपूर्वी परिसरातील सर्व अवैध धंदे बंद झाल्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. आजही अनेक ठिकाणी पानटपरीवरून आणि मोबाईलवरून मटका सुरू आहे. तसेच खेड्यापाड्यात पानटपरी आणि चहाटपरीवरून अवैध दारूविक्री होताना दिसत आहे. मटका पट्टी, भंगारचोरी काही प्रमाणात कमी होताच कोळशा चोरीने डोके वर काढले आहेत. आजही या सर्व गोष्टी छुप्या रितीने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ज्या गोष्टी सर्वसामान्यांना दिसत आहेत. त्या गोष्टी पोलीस प्रशासनाला का दिसत नाही असा प्रश्न जनतेमधून विचारला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.